शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

अवनी भारताची पहिली महिला फायटर पायलट

भारतीय वायुसेनेतील फ्लाइंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी हिने मिग-21 बायसन हे लढाऊ विमान एकटीने उडवून एक नवा इतिहासच रचला आहे. 19 फेब्रवारीच्या सकाळी अवनीने गुजरातच्या जामनगर लष्करी हवाई तळावरुन उड्डाण घेतले आणि ही मोहीम यशस्वी केली. एकटीने लढाऊ विमान उडविणारी पहिली भारतीय महिला होण्‍याचा मानही तिने मिळवला.
 
अवनीने या मोहिमेला सुरुवात करण्यापूर्वी तिच्या प्रशिक्षकांनी मिग-21 बायसन विमानाची पूर्णत: पडताळणी केली. उड्डाणादरम्यान लक्ष ठेवण्यासाठी तसेच अवनीला प्रोत्साहन देण्यासाठी अनुभवी फ्लायर्स आणि तिचे प्रशिक्षक जामनगर लष्करी तळावरील हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष आणि धावपट्टीवर उपिस्थत होते. अवनीने उडविलेले मिग-21 बायसन हे लढाऊ विमान जगातील सर्वाधिक लँडिंग आणि टेक ऑफ स्पीड असणारे विमान आहे.
 
2016 मध्ये अवनी चतुर्वेदी, मोहना सिंह आणि भावना या तीन स्त्रियांना प्रथमच वायुसेनेत फायटर पायलट बनण्यासाठी प्रवेश देण्यात आला होता. तत्पूर्वी ऑक्टोबर 2015 मध्ये सरकारने स्त्रियांना फायटर पायलट बनण्यासाठीचा मार्ग मोकळा करुन दिला होता. ब्रिटन, अमेरिका, इस्त्रायल आणि पाकिस्तान यासारख्या जगातील निवडक देशामंध्येच स्त्रिया फायटर पायलट बनू शकतात.
 
एखादे लढाऊ विमान एकट्याने उडविणे हे पूर्णत: एक फायटर पायलट बनण्याच्या दिशेने पहिले पाऊल असते. अवनीने यशस्वीरीत्या हे पहिले पाऊल उचलले असून या क्षेत्रात येऊ इच्छिणार्‍या तिच्यासारख्याच महत्त्वाकांक्षी महिलांसाठी एक नवे अवकाशच निर्माण करुन दिले आहे. अवनीचे हे यश भारतीय वायुसेनेसाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्य असल्याचे मत एअर कमोडोर प्रशांत दीक्षित यांनी व्यक्त केले.