मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

अरविंद केजरीवाल पुन्हा 'आम आदमी'; मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

WD
नवी दिल्ली- दिल्ली विधानसभेत लोकपाल विधेयक मंजूर करण्यात अपयशी ठरले. याची नैतिक जबाबदारी स्विकारून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास राजीनामा दिला. नायब राज्यपाल नजीब जंग यांना राजीनामा सादर केला आहे.

अवघ्या 49 दिवसांमध्ये 'आम आदमी पक्षाचे सरकार कोसळले. भारताच्या इतिहासात हा प्रकार पहिल्यांदा घडला असावा. सचिवालयातून केजरीवाल आणि त्यांचे सहकारी थेट पक्षाच्या कार्यालयात उपस्थित झाले. तिथे त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत कॉंग्रेससह भाजपवर जोरदार हल्ला चढविला. मुकेश अंबानींच्या इशार्‍यावर केंद्र सरकार चालते, असाही घणाघाती आरोप केजरीवाल यांनी केला.

केजरीवाल म्हणाले, काँग्रेसने आम्हाला विश्वास दिला होता, की विधानसभेत जनलोकपाल विधेयक मंजूर करण्यासाठी पाठिंबा दिला जाईल. मात्र, त्यांनीच विश्वासघात केला. भारताच्या इतिहासात आजपर्यंत भाजप आणि काँग्रेस एक झाल्याचे कधीच पाहायला मिळाले नाही. मात्र, दिल्ली विधानसभेत कॉंग्रेस- भाजपचे पडद्यामागचे राजकारण जगासमोर आले आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे गेल्या तीन दिवसांपूर्वी आम्ही मुकेश आंबानी विरोधात गुन्हा दाखल केला. अंबानींकडूनच केंद्र सरकारला तगडा निधी मिळतो. अंबानींच देशाचे सरकार चालवत आहे.

भाजप- काँग्रेसच्या मोठ मोठ्या सभांसाठी पैसा कोठून येतो, असाही सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला. कॉंग्रेस- भाजपच्या खेळीमुळे लोकपाल विधेयकाला मंजुरी मिळू शकली नाही. लोकपाल विधेयकासाठी आपण शंभरवेळा राजीनामा द्यायला तयार असल्याचेही केजरीवाल यांनी सांगितले.

'आप' सरकार चालवता येत नाही, अशी टीका विरोधकांनी केली. परंतु, पाच वर्षांत कॉंग्रेसला जे जमले नाही, ते 'आप' सरकारने अल्पावधीत करून दाखवले. काँग्रेसला पाचवर्षात वीजेचे ऑडिट करता आले नाही आम्ही केवळ पाच दिवसांत केले, असे सांगत त्यांनी पुन्हा एकदा लढा उभारावा लागेल, असेही आवाहन केजरीवाल यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले.

दरम्यान, केजरीवाल सरकारने दिल्ली विधानसभेत शुक्रवारी अखेर जनलोकपाल विधेयक सादर केले. त्यावरून सभागृहात प्रचंड गोंधळ झाला. गोंधळातच विधेयक सादर झाले. विधानसभा अध्यक्षांनी विधेयक सादर झाल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, विधेयकावर चर्चेची पवानगीही त्यांनी दिली. मात्र, काँग्रेस आणि भाजप आमदारांनी त्यावर हरकत नोंदवली. शेवटी विधेयक सादर झाले किंवा नाही यावर मतदान घेण्यात आले आणि काँग्रेस-भाजपसह 42 सदस्यांनी विधेयक सादर झाले नसल्याचे मत नोंदवले. त्यानंतर अध्यक्षांनी विधेयक सादर झाले नसल्याची घोषणा केली.

लोकपाल विधेयक सभागृहात सादरही होऊ न शकल्यामुळे पूर्वी दिलेल्या घोषणेनुसार केजरीवाल यांनी राजीनाम्याचे संकेत दिले होते. त्यांच्यासोबत संपूर्ण मंत्रिमंडळ राजीनामा देईल, असेही बोलले जात होते. आणि अखेर केजरीवाल यांच्या राजीनाम्याचे वृत्त समजताच आप समर्थक हनुमान रोड येथील कार्यालयाजवळ मोठ्या संख्येने गर्दी करू लागले. आठ वाजता केजरीवाल येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधतील आणि राजीनाम्याची घोषणा केली.