गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 23 जानेवारी 2015 (10:56 IST)

ओबामांच्या दौर्‍यात आतंकी हल्ल्याचे सावट

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौर्‍याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले असताना देशातील संवेदनशील शहरांमध्ये अतिरेकी हल्ल्याचे सावट निर्माण झाले आहे. दिल्ली, मुंबई व आगरा ही शहरे अतिरेक्यांच्या रडारवर असून तनिमित्त सुरक्षा व्यवस्था अति कडक करण्यात आली आहे.
 
ओबामांच्या दौर्‍यात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सुरक्षा यंत्रणांना सज्ज राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. गोव्यातून धमकी देणार्‍या अशाच एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.
 
प्रजासत्ताक दिनाच्या संचलन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलेल्या बराक ओबामांचे 25 जानेवारी रोजी भारत दौर्‍यावर आगमन होणार असून त्यासाठी दिल्लीसह देशातील महानगरातील सुरक्षा व्यवस्था अति कडक करण्यात आली आहे. बराक ओबामांचा हा दौरा तीन दिवसांचा राहणार असून यामध्ये ओबामा ताजमहाल पाहण्यासाठी जाणार असल्याचे सांगण्यात येते.   
 
तीन दिवसांच्या भारत दौर्‍यासाठी बराक ओबामा यांचे 25 जानेवारीला भारतात आगमन होणार आहे. त्याचदिवशी बराक ओबामा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार आहे. तसेच ओबामा याच दिवशी भारतातील प्रमुख कंपन्यांच्या सीईओबरोबर चर्चाही करणार आहेत. अमेरिकेहून आलेल्या एका शिष्टमंडळाचाही त्यात समावेश असेल. या शिष्टमंडळामध्ये अमेरिकेच्या प्रमुख कंपन्यांच्या सीईओंचा समावेश असेल. 
 
26 जानेवारी रोजी सकाळी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यामध्ये सहभागी झाल्यानंतर बराक ओबामा दिल्लीच्या शाळेत किंवा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करतील. मात्र हा कार्यक्रम कोणत्या शाळेत किंवा माहाविद्यालयात होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 27 जानेवारीला ओबामा ताजमहाल पाहण्यासाठी आगरा येथे जाणार आहेत.