शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

काश्मीर हिंसाचारामागे पाकचे लष्कर

नवी दिल्ली- हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा काश्मीरमधील म्होरक्या बुरहान वानी चकमकीत मारला गेल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पेटलेल्या आंदोलनाच्या आगीत पाकिस्तानी सैन्य व लष्कर-ए-तोयबा ही दहशतवादी संघटना तेल ओतत आहे, अशी स्पष्ट कबुली सुरक्षा दलाने जिवंत पकडलेल्या बहादूर अली या दहशतवाद्याने दिली आहे.
 
तोयबाच्या सदस्य असलेल्या बहादूर अलीला 25 जुलै रोजी सुरक्षा दलाने अटक केली होती. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) केलेल्या चौकशीत अलीने पाकिस्तानी लष्कराच्या काश्मीरमधील कारवायांची जंत्रीच दिली आहे. काश्मिरात गोंधळ माजवण्यासाठी पाकिस्तानी लष्कर हे तोयबाला मदत करत असल्याचे त्याने सांगितले आहे. एनआयचे महानिरीक्षक संजीव कुमार यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बहादूर अलीच्या कबुलीजबाबाचा व्हिडिओही एनआयएने जाहीर केला.
 
त्यानुसार, बहादूर अलीला जमात-उद-दवाने दहशतवादी रॅकेटमध्ये आणले. नंतर तोयबाने त्याचे ब्रेनवॉशिंग केले. त्याला मनशेरा, अक्सा व मुझफ्फराबाद इथे दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देण्यात आले. अलीसोबत तोयबाच्या कॅम्पमध्ये पाक व अङ्खगाणिस्तानच्या वेगवेगळ्या भागांतील 30 ते 50 तरुण असायचे. भारतात घुसखोरी करण्याआधी पाकिस्तानी लष्कराचे दोन अधिकारी त्याला भेटले होते. 
 
पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाक लष्करातर्फे अल्फा 3 नावाचं एक कमांड सेंटर चालवलं जातं. काश्मीरमध्ये घुसखोरी केल्यानंतर कुठं राहायचं, लोकांमध्ये कसं मिसळायचं, जेवणाची सोय कशी करायची आणि कुठे कधी करायचे या सार्‍या सूचना याच सेंटरमधून दिल्या जातात. अलीलाही इथूनच सर्व संदेश मिळत होते, असं अलीनं सांगितलं आहे.