शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By
Last Modified: ​मुझफ्फरपूर , मंगळवार, 4 मार्च 2014 (10:22 IST)

कॉंग्रेसनेच देशाचा विकास रोखला- नरेंद्र मोदी

सत्ताधारी कॉंग्रेसला देशातील जनतेच्या समस्यांचे काही एक घेणेदेणे नाही. विशेष म्हणजे कॉंग्रेस कोणतेही आश्वासन पाळलेले नाही. विकासाचा दावा  करणार्‍यांनी आत्तापर्यंत केवळ दोन हजार लोकांना नोकर्‍या   दिल्या असून, अनेक राज्यांतील विकासकामे कॉंग्रेसने रोखून  धरल्याचा आरोप भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी सोमवारी मुझफ्फरपूरमध्ये हुकांर रॅलीत केला.
 
लोकजनशक्तींचे अध्यक्ष रामविलास पासवान आणि मोदी यावेळी एकाच व्यासपीठावर दिसले. मोदींनी पासवान यांना जुने मित्र म्हणून संबोधले. पासवान यांनी मोदींची प्रशंसा केली. 
 
मोदी म्हणाले, 'मोदी रोको'हाच कॉंग्रेस पक्षाचा एकमेव  अजेंडा आहे. कॉंग्रेस  धर्मनिरपेक्षतेच्या नावा खाली मतांचे राजकारण करत आहे. मात्र, आमच्यासाठी धर्मनिरपेक्षता म्हणजे विकासाचा मार्ग आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे जोडा आणि विकास करा, असे धोरण आहे. मात्र कॉंग्रेसचे धोरण याच्या उलट आहे. देशातील कोणत्याही प्रश्नावर  कॉंग्रेसकडे उत्तर नाही. केवळ मोदी विरोध हेच त्यांच्या  राजकारणाचे सूत्र आहे, असाही आरोप मोदी यांनी केला.
 
आगामी दशक हे विकासाचे दशक असणार  आहे. या दहा वर्षांत दलित, पीडित, शोषित यांचा   विकास करणार असल्याचे आश्वासन मोदींनी यावेळी दिले.