शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 27 मे 2015 (12:20 IST)

जनतेच्या अपेक्षापूर्तीसाठी खूप काही करायचे आहे

जनतेच्या अपेक्षा खूप मोठय़ा असून त्या पूर्ण करणसाठी अजून खूप काही करायचे आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभरात केलेल्या कामाचा आढावा सादर करताना व्यक्त केले.
 
सरकारचे प्रगतिपुस्तक सादर करताना मोदी यांनी जनतेला दोन पत्रांद्वारे संदेश दिला आहे. वर्षभरात केलेल विविध उपायोजना व सुरू केलेल्या प्रयत्नांची माहिती देऊन मोदी यांनी म्हटले आहे की, ही केवळ सुरुवात आहे.
 
भ्रष्टाचार आणि अनिणार्यक स्थिती असताना कारभार हाती घेतल्याचे सांगून मोदी यांनी पत्रात म्हटले आहे की, महागाईमुळे सामान्य जनता असह्य झाली होती. 
 
डिझेल नियंत्रणमुक्त करणे, एफडीआयची मर्यादा विमा व संरक्षण क्षेत्रासाठी वाढविणे, वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू करण्यासाठी विधेयक आदी प्रलंबित विषयांना आपल्या सरकारने चालना दिल्याचे त्यांनी या पत्रांमध्ये म्हटले आहे. चालू आर्थिक वर्षात विकासदर 8 टक्के राहण्याची अपेक्षा व्यक्त करून मोदी यांनी वित्तीय तूट 4 टक्कयांवरून 3.9 टक्क्यांपर्यंत येण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. 
 
पत्रातील महत्त्वाचे मुद्दे 
 
* ‘अंत्योदय’च्या तत्त्वानुसार गरीब, मागासांसाठी काम 
 
* भ्रष्टाचारमुक्त शासनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पारदर्शक व्यवहार सुरू केले
 
* विकासाची फळे गरीब, शेतकरी व महिलांना निश्चितपणे मिळतील
 
* जनधन योजनेंतर्गत 15 कोटींपेक्षा अधिक बँकखाती सुरू झाली व 15 हजार 800 कोटी बँकेत जमा झाले
 
* पेन्शन व अपघात विमा योजनेस 6.75 कोटी लोकांचा प्रतिसाद
 
* कोळसा खाणींच्या लिलावातून राज्यांना मिळणार 3.35 लाख कोटी रुपये