शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

जया बच्चन यांना राजचा मराठी झटका

आधी माफी, मग चित्रपट

'हम यू पी वाले है, हम तो हिंदी में ही बात करेंगे', असे वक्तव्य करत नव्या वादाला जन्म देणाऱ्या अभिनेत्री जया बच्चन यांना त्यांचे वक्तव्य आता महागात पडले आहे. जया यांनी आधी मराठी माणसांची माफी मागावी अन्यथा त्यांचाच काय अमिताभसह त्यांच्या कुटुंबातील एकाही सदस्याचा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ न देण्याचे फर्मान आज मनसे नेते राज ठाकरे यांनी आज काढले. ठाकरे यांच्या विधानानंतर पोलिसांनी त्यांच्यावर तातडीने भाषणबंदीची कारवाई केली. तसेच पत्रकार परिषदही घेण्यास मनाई केली.

मुंबईत एक पत्रकार परिषद घेऊन राज यांनी ही घोषणा केली. बच्चन कुटुंबिय कोणत्याही जाहिरात फलकावर दिसल्यास त्यावरही काळे फासण्याचे 'आदेश' त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. बच्चन कुटुंबिय जाहिरात करत असलेल्या उत्पादनांची खरेदीही मराठी माणसाने करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. बच्चन यांचे चित्रपट प्रदर्शित न करण्याचा इशारा त्यांनी थिएटर मालकांना दिला. कोणता थिएटर मालक चित्रपट प्रदर्शित करतो, ते पाहूच, असा खास ठाकरी शैलीतील इशारा त्यांनी दिला.

राज यांच्या इशार्‍याचे मू
दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात अभिनेत्री प्रियंका चोप्रा इंग्रजीत बोलत असताना जया यांनी हस्तक्षेप करून तिला हिंदीत बोलण्यास सुचविले होते. त्यानंतर पुन्हा उठून हम यूपी वाले है इसलिए हिंदी में बात करेंगे. महाराष्ट्र के लोग हमें माफ करे असे म्हटले होते. यावर राज यांनी तिखट शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून, आता जया यांनी आधी मराठी माणसांची माफी मागावी अन्यथा त्यांची गय केली जाणार नसल्याचे म्हटले आहे. जया यांनी जाणून- बुजून मराठी माणसांना डिवचण्याचा प्रयत्न केला असून, आता त्यांना त्यांच्या कर्माची फळे भोगावी लागतील असा इशाराही दिला आहे.

जंगलराज निर्माण करू देणार नाही- अमरसिं
समाजवादी पक्षाचे नेते व बच्चन कुटुंबियांचे जवळचे मित्र अमरसिंह यांनी ठाकरे यांच्या विधानावर टीका केली आहे. या देशात कायदेशीर व्यवस्था असून 'जंगल राज' निर्माण करू दिले जाणार नाही, असेही ते म्हणाले.

कॉंग्रेसचीही राज यांच्यावर टीका
दरम्यान, राज जया यांच्या विधानाचा राजकीय फायदा उचलू पहात आहे, अशी टीका कॉंग्रेसने केली आहे. 'ज्यांची मुले बॉम्बे स्कॉटिश सारख्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत आहेत, त्यांना इतरांना बोलण्याचा अधिकार नाही, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते संजय निरूपम यांनी केली. दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यापूर्वीच जया बच्चन यांच्या विधानाचा समाचार घेतला असून अशी भाषा मराठी लोक सहन करणार नाहीत, असा इशारा दिला होता.

द्रोणचे भवितव्य अनिश्चि
राज यांच्या इशार्‍याने अभिषेक बच्चनच्या 'द्रोण' या चित्रपटाचे प्रदर्शन अनिश्चिततेच्या भोवर्‍यात सापडले आहे. द्रोणचे दिग्दर्शन राज ठाकरे यांची मैत्रिण सोनाली बेंद्रेचा पती गोल्डी बहल करत आहे. या चित्रपटात अभिषेक व्यतिरिक्त प्रियांका चोप्रा, के. के. मेनन, जया बच्चन व संजय दत्त आहेत.ठाकरे यांच्या धमकीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी दादर भागात अमिताभ यांच्या नव्या चित्रपटाची पोस्टर्स आणि होर्डींग्ज फाडून टाकले.