मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 31 जुलै 2014 (10:50 IST)

टोमॅटोची श्रीमंती!

वाढत्या महागाईच्या काळात देशातील गोरगरिबांना दिलासा देणे तर दूरच, उलट त्यांच्या भळभळत जखमेवर मीठ चोळण्याचेच काम  सत्ताधारी पक्षातील लोक करत असतात. ‘ज्यांचे गाल लाल आहेत ते टोमॅटोचे सेवन करीत असतात. म्हणूनच टोमॅटो हे श्रीमंतांचेच अन्न आहे, गरीब त्याकडे ढुंकूनही पाहात नाहीत’, असे संतापजनक व हासस्पद तर्कट भाजपचे राष्ट्रीय उपाध्क्ष, खासदार प्रभात झा यांनी मांडले आहे. सध्या देशभरातील भाजी मंडईत टोमॅटोसारख्या कायम स्वस्त असणार्‍या फळभाजीच्या दराने शंभरी गाठलेली असतानाच झा यांच्यासारख्या शासनातील जबाबदार व्यक्तीने मात्र अशी अक्कल पाजळ्याने, जनतेच्या आर्थिक स्थितीची टिंगल उडविण्यासारखेच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महागाईच्या आगीत होरपळणार्‍या आम जनतेला चांगले दिवस दाखविण्याचे वचन दिले होते. 
 
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा हाच मुख्य मुद्दा होता. परंतु अजूनतरी मोदी सरकारकडून आपल्या वचनाची पूर्तता होऊ शकलेली नाही. जीवनावश्क वस्तूंच्या किमती तातडीने खाली येणार नसल्याचा निर्वाळा पंतप्रधान मोदी आणि मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी पुन्हा पुन्हा देत आहेत. सध्या भाजी मंडईतील महागाईमुळे आम जनता वैतागलेली असतानाच अशा बिनबुडाच्या वक्तव्यामुळे जनक्षोभात भरच पडत आहे. मागे यूपीए सरकारच्या काळातही अशीच बेजबाबदार व्यक्तव्ये करण्याची स्पर्धाच सुरू असायची. मुंबईमध्ये अवघ्या 12 रुपांयांमध्ये पोटभर जेवण मिळते, असे संशोधन काँग्रेसचे नेते राज बब्बर यांनी केले होते. त्याचबरोबर रशीद मसूद, फारूख अब्दुल्ला यांचाही स्वस्त जेवणाबाबत बोलताना तोल सुटला होता. आता भाजप नेते प्रभात झा यांच्या त्यात विधानाचीही भर पडली आहे. सरकार कुठल्याही पक्षाचे वा आघाडीचे असो, जनतेच्या परिस्थितीत काहीच फरक पडत नाही. त्याचबरोबर गरिबांच्या गरिबीची टिंगल-टवाळी करणारेही सर्वकाळ असतातच. महागाई कमी होत नसल्याची जबाबदारी लगेच मोदी सरकारवर ढकलणची घाई करू नये,  अशी अपेक्षा व्यक्त करणार्‍या  झा यांनी टोमॅटोच्या वाढलेल किमतीची श्रीमंतीशी घातलेली सांगड अजबच म्हणावी लागेल.