शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

तेलंगणाचा मार्ग मोकळा

WD
स्वतंत्र तेलंगणाच्या मागणीसाठी तेलंगणा समर्थकांनी केलेल्या दीर्घकालीन आंदोलनाला अखेर यश आले असून, आज काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत स्वतंत्र तेलंगणाला मंजुरी दिली. त्यामुळे तेलंगणाचा मार्ग मोकळा झाला आहे. लोकभावना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे काँग्रेसच्या वतीने

सांगण्यात आले. त्यामुळे तेलंगणा हे देशातील २९ वे राज्य असेल. या राज्यात एकूण १० जिल्ह्यांचा समावेश होणार असून, हैदराबाद ही पुढील १० वर्षे दोन्ही राज्यांची संयुक्त राजधानी असेल, असेही सांगण्यात आले. या घोषणेनंतर आंध्र प्रदेशात तेलंगणा समर्थकांनी जल्लोष केला.

सर्वप्रथम मंगळवारी दुपारनंतर झालेल्या बैठकीत संपुआने स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीला हिरवा कंदील दाखविला. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास झालेल्या काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत स्वतंत्र राज्याला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे स्वतंत्र तेलंगणाचा मार्ग मोकळा झाला आहे. संपुआ समन्वय समितीची बैठक दुपारी चारच्या सुमारास झाली होती. त्यानंतर सायंकाळी काँग्रेस कार्य समितीची बैठक झाली. या बैठकीत तेलंगणा राज्याला मंजुरी दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रवक्ते दिग्विजयसिंग आणि अजय माकन यांनी सांगितले की, हा निर्णय घेणे अतिशय कठीण होते. तथापि, लोकभावना लक्षात घेऊन याबाबतचा निर्णय घेण्यात आला. या नव्या राज्यात

एकूण १० जिल्ह्यांचा समावेश असेल आणि दोन्ही राज्यांची राजधानी पुढील दहा वर्षे हैदराबादच असेल. दहा वर्षांनंतर आंध्र प्रदेशातील एक शहर राजधानीचे ठिकाण होईल आणि हैदराबादच स्वतंत्र तेलंगणाची राजधानी राहील. काँग्रेस कार्य समितीने निश्चित कालावधीत स्वतंत्र राज्याची स्थापना करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे. आंध्र प्रदेशातील किनारपट्टीचा भाग आणि रायलसीमासह आंध्र प्रदेश असणार आहे. स्वतंत्र राज्याच्या स्थापनेसाठी पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागेल. त्यामध्ये संसदेत राज्य पुनर्रचना विधेयक बहुमताने मंजूर करून घ्यावे लागेल. त्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेत दोन तृतीयांश बहुमत मिळणे आवश्यक आहे.

कडेकोट बंदोबस्त

स्वतंत्र तेलंगणा राज्याची घोषणा होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्यात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला. केंद्र सरकारने अगोदरच सीआरपीएफ, बीएसएफ, सीआयएसएफ आणि आयटीबीपीचे एक हजार जवान पाठवून दिले आहेत. याअगोदरच मागील आठवड्यात १२०० अतिरिक्त जवान तैनात केलेले आहेत. तामिळनाडू, कर्नाटकमधील निमलष्करी दलाच्या जवानांना राज्यात आणले आहे. त्यामुळे सर्वत्र कडेकोट बंदोबस्त आहे. विशेषतः हैदराबाद शहरात सुसक्षा अधिक वाढविली आहे.

तेलंगणा २९ वे राज्य

स्वतंत्र तेलंगणा राज्याची स्थापना झाल्यास हे २९ वे राज्य असेल, असे सांगण्यात आले. या भागाचा १९५६ मध्ये आंध्र स्टेटमध्ये विलय झाला होता. त्या अगोदर हैदराबाद स्टेट जसे होते, तसेच तेलंगणा राज्याची रचना असेल.

१० जिल्ह्यांचा समावेश

तेलंगणा राज्यात हैदराबादसह आदिलाबाद, खम्मम, करीमनगर, महेबूबनगर, निजामाबाद, मेडक, नालगोंडा, रंगारेड्डी, वारंगल अशा एकूण १० जिल्ह्यांचा समावेश आहे.

प्रस्तावित तेलंगणाचे क्षेत्रफळ

११४,८४० चौ. किमी असून लोकसंख्या-३ कोटी ५२ लाख ८६ हजार ७५७ एवढी आहे. तेलंगणा राज्यात १७ लोकसभा मतदारसंघांचा तर ११९ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

आंध्रमध्ये १३ जिल्हे

आंध्र प्रदेशमध्ये १३ जिल्हे राहणार असून, यात अनंतपूर, चित्तूर, कडप्पा, कर्नूल, श्रीकाकुलम, विझियानाग्राम, विशाखापट्टणम, पूर्व गोदावरी, पश्चिम गोदावरी, कृष्णा, गुंटूर, प्रकाशम, नेल्लोर यांचा समावेश आहे. नव्या आंध्रचे क्षेत्रफळ-१६०,२०५ चौ. किमी असून लोकसंख्या-४ कोटी ९३ लाख ६९ हजार ७७६ आहे. नव्या आंध्रमध्ये २५ लोकसभा मतदारसंघ राहणार असून १७५ विधानसभा मतदारसंघ आहेत.

स्वतंत्र तेलंगणासाठी १४०० लोकांचे बलिदान

स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीच्या मागणीसाठी आतापर्यंत १४०० जणांनी बलिदान दिले आहे. १९५६ मध्ये जेव्हा या भागाचा आंध्र प्रदेशात विलय झाला, तेव्हापासूनच स्वतंत्र तेलंगणाची मागणी सुरू झाली होती. १९४८ पर्यंत हा भाग निजाम राजवटीखाली होता. स्वतंत्र तेलंगणासाठी प्रथम १९६९ मध्ये मोठे आंदोलन झाले. त्यावेळी भडकलेल्या हिंसाचारात ४०० लोकांचा बळी गेला होता. त्यानंतर पुन्हा हे आंदोलन शांत झाले. २००१ मध्ये जेव्हा चंद्रशेखर राव तेलगू देसममधून बाहेर पडले, त्यानंतर त्यांनी पुन्हा ही

मागणी उचलून धरली. २००९ पासून पुन्हा आंदोलन पेटले आणि त्यावेळीपासून आतापर्यंत १००० विद्याथ्र्यांनी स्वतंत्र तेलंगणासाठी आत्महत्या केली.