बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By
Last Modified: अहमदाबाद , गुरूवार, 17 एप्रिल 2014 (15:33 IST)

नरेंद्र मोदींवर वैवाहिक माहिती लपविल्याचा आरोप

भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींवर वैवाहिक माहिती लपविल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तीन आठवड्यांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश अहमदाबाद कोर्टाने स्थानिक पोलिसांना दिले आहेत. आम आदमी पक्षाच्या एका कार्यकर्त्याने तक्रार दाखल केली होती. यावर आज, गुरुवारी सुनावणी देताना न्यायाधीश एम.एम.शेख यांनी मोदींच्या वैवाहिक स्थितीबद्दल माहिती सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

बडोदा येथे उमेदवारी अर्ज दाखल करताना नरेंद्र मोदी यांनी ते विवाहीत असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे उमेदवारी अर्जातील पत्नीच्या रकान्यात जशोदाबेन असाही उल्लेख केला होता. मात्र, गुजरामध्ये याआधी झालेल्या सर्व निवडणुकीत मोदींनी आपल्या वैवाहिक स्थितीसंदर्भातील यापूर्वी माहिती दिली नव्हती.

यामुळे मोदींनी वैवाहीक माहिती लपविल्याचा आरोप 'आप'चे सदस्य निशांत वर्मा यांनी केला होता. एवढेच नव्हे तर पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रारही  दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, पोलिसांनी तक्रार दाखल करुन न घेतल्याने वर्मा यांनी थेट कोर्टात धाव घेतली. त्यानुसार कोर्टाने मोदींच्या वैवाहिक माहितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.