गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 4 ऑगस्ट 2015 (10:06 IST)

नागालँडमधील बंडखोर आणि सरकारमध्ये महत्त्वपूर्ण करार

नवी दिल्ली- नागालँडमधील प्रमुख बंडखोर संघटना ‘एनएससीएन’ने भारत सरकारशी सोमवारी महत्त्वपूर्ण शांतता करार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह आणि एनएससीएन संघटनेच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत नवी दिल्लीत गृह विभागाच्या अधिकार्‍यांबरोबर करारावर स्वाक्षर्‍या झाल्या. 
 
या करारानुसार परस्परांवरील हल्ल्यांना पूर्णविराम देण्यात आला आहे. या करारामुळे नव्या युगाची सुरुवात झाल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केले. नागालँडमध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी हा करार होणे महत्त्वपूर्ण होते आणि त्यासाठी मी पंतप्रधानपदाचा कार्यभार सांभाळल्यापासून प्रयत्नशील राहिलो, असे मोदी म्हणाले. या करारामुळे गेल्या 60 वर्षापासून असलेल्या समस्या निकाली निघाल्या असून खांद्याला खांदा लावून नागालँड आणि देशाचा विकास होईल, असा विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला. तसेच नागालँडच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी, तेथील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी एका अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात आल्याचीही घोषणा मोदी यांनी केली. दरम्यान, ‘एनएससीएन’ ही संघटना नागालँडमधील एक शक्तिशाली बंडखोर संघटना म्हणून ओळखली जाते. त्यामुळे हा शांती करार म्हणजे पूर्वोत्तर राज्यांमध्ये शांतता नांदण्याच्या दृष्टीने टाकलेले महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले जात आहे.