शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 17 सप्टेंबर 2014 (10:27 IST)

पोट निवडणुकीत भाजपला धोबीपछाड: युपीत सपा तर राजस्थानात काँग्रेस

दहा राज्यात विधानसभेच्या 33 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठ्या  पराभवाचा सामना करावा लागला. उत्तर प्रदेश आणि राजस्थानाबरोबरच गुजरातमध्येही काँग्रेसने शानदार कामगिरी  केली. भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या गुजरातमधील नऊपैकी तीन जागा काँग्रेसने भाजपकडून पळवल्या.  मात्र सहा जागा राखण्यात भाजपला यश आले. लोकसभेच्या तीन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत गुजरातमधील जागा भाजप, उत्तर प्रदेशातील जागा समाजवादी तर सीमांध्रातील जागा टीआरएसच्या ताब्यात गेली आहे.

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष तर राजस्थानात काँग्रेसने भाजपला जोरदार धक्का दिला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्येही काँग्रेसने भाजपचे वर्चस्व यावेळी तरी मोडीत काढले आहे. पोटनिवडणुकीचे निकाल धक्कादायक असून ते नरेंद्र मोदी यांना मंथन करायला लावणारे आहेत.

उत्तरप्रदेशातील 11 जागांपैकी 8 समाजवादी पक्षाने जिंकल्या आहेत, तर उर्वरीत 3 जागा भाजपने राखल्या आहेत. विशेष म्हणजे समाजवादी पक्षाने मिळवलेल्या आठपैकी सात जागांवर आधी भाजपचा ताबा होता. त्या खेचून आणण्यात समाजवादीला यश आले आहे. दरम्यान, इतर राज्यांत पराभवाचा सामना करावा लागलेल्या भाजपने ममता बॅनर्जींच्या पश्चिम बंगालमध्ये पुन्हा प्रवेश केला आहे. भाजपला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. 

दरम्यान, राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या हातातून सत्ता हिसकावणार्‍या वसुंधरा राजे यांच्या राजस्थानात भाजपला पछाडत काँग्रेसने बाजी मारली आहे. काँग्रेसने चारपैकी तीन जागा जिंकत राज्यातील भाजप कार्यकारिणीला विचार करण्यास भाग पाडले आहे.