शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 25 जानेवारी 2016 (11:59 IST)

महात्मा गांधी श्रीरामाचे, सावरकर दुर्गादेवीचे भक्त

महात्मा गांधींची हत्या आणि या प्रकरणी कट रचल्याच्या आरोपात स्वातंत्र्यवीर सावरकरांवर चालविण्यात आलेल्या खटल्याच्या सुमारे चार दशक आधी भारतमातेचे हे दोन्ही सुपुत्र लंडनमधील दसरा कार्यक्रमाच्या अनुषंगाने एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी महात्मा गांधी यांनी प्रभू श्रीरामचंद्राची आणि सावरकर यांनी दुर्गा देवीची मनोभावे स्तुती केली होती.
 
तो दिवस होता २४ ऑक्टोबर १९०९ चा! लंडनमधील भारतीय समुदायाने महात्मा गांधी यांना कार्यक्रमाची अध्यक्षता भूषविण्यासाठी निमंत्रित केले होते. भाषणांमध्ये राजकीय वक्तव्य राहणार नाही, या अटीवर महात्मा गांधींनी निमंत्रण स्वीकारले होते. विशेष म्हणजे, लंडनमध्येच कायद्याचा अभ्यास करीत असलेल्या सावरकरांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण होते. राजकारणाचा उल्लेख होणार नाही, असा निर्धार झाला असतानाही गांधी आणि सावरकरांनी आपापल्या धार्मिक भाषणात राजकारणातील आपल्या आदर्शांचा आवर्जून उल्लेख केला.
 
दसरा महोत्सवाबाबत बोलताना महात्मा गांधी यांनी श्रीरामांच्या शांतता गुणांचा गौरव केला आणि मीदेखील रामाच्याच शांतता गुणांचे अनुकरण करीत असल्याचे स्पष्ट केले. तिथेच, सावरकरांनी राक्षसांचा संहार करणारी दुर्गा देवी आपला आदर्श असल्याचे सांगितले होते. महात्मा गांधींवरील पुस्तकाचे लेखक प्रमोद कपूर यांनी हा संदर्भ दिला आहे.
 
या दसरा महोत्सवात हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मांचे नागरिक उपस्थित होते. प्रखर हिंदुत्ववादी नेते अशी ओळख असलेले सावरकर आपल्या भाषणात म्हणाले होते की, हिंदू हे हिंदुस्थानचा आत्मा आहेत. ज्याप्रमाणे, इंद्रधनुष्याचे सौंदर्य त्याच्या विविध रंगांमध्ये असते, त्याचप्रमाणे मुस्लिम, पारशी, ज्यू आणि अन्य समाजातील लोक एकत्र येतील, तेव्हा भारताचीही सुंदरता अधिक खुलून दिसेल. सावरकरांच्या या मताशी महात्मा गांधीदेखील सहमत झाले होते, असे कपूर यांनी म्हटले आहे. या घटनेच्या ३९ वर्षांनंतर २४ मे १९४८ रोजी महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली आणि नथुराम गोडसेसोबतच सावरकरांवरही हत्येचा कट रचल्याचा खटला चालविण्यात आला होता, असा उल्लेखही त्यांनी केला आहे.