शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : गुरूवार, 27 ऑगस्ट 2015 (15:03 IST)

महाराष्ट्रातील 10 शहरांसह 98 शहरे होणार 'स्मार्ट सिटी'

नवी दिल्ली- केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजना आज प्रारंभ करण्यात आली असून, यात देशातील 98 शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
 
केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज स्मार्ट सिटी योजनेत निवडण्यात आलेल्या 98 शहरांची यादी जाहीर केली. त्यांनी सांगितले की केंद्र सरकार पुढील पाच वर्षांमध्ये या शहरांच्या विकासासाठी 48 हजार कोटी रुपयांची रक्कम खर्च करणार तसेच राज्य सरकारही एवढीच रक्कम खर्च करणार आहे. 
 
स्मार्ट सिटी योजनेमध्ये निवडण्यात आलेल्या शहरांमध्ये उत्तर प्रदेशातील 13, तामिळनाडूतील 12, महाराष्ट्रातील 10, मध्य प्रदेशातील 7, गुजरात आणि कर्नाटकमधील 6, राजस्थान व पश्चिम बंगालमधील 4, आंध्र प्रदेश आणि बिहारमधील तीन शहरांचा समावेश आहे. तसेच जम्मू काश्मीर सरकारने आपल्या दोन शहरांचे नाव प्रसिद्ध करण्यासाठी वेळ मागितला आहे.
 
जाहीर यादीत 24 राजधानी शहरे आहेत. तसेच 24 व्यापार व औद्योगिक संबंधी आणि 18 सांस्कृतिक व पर्यटन संबंधी शहरे आहेत. राजधानी शहरांमध्ये चेन्नई, अहमदाबाद, मुंबई, हैदराबाद, पाटणा, शिमला, बंगळूर, दमन, कोलकाता, गंगटोक आदी शहरांचा समावेश आहे. 
 
महाराष्ट्रातून निवडण्यात आलेल्या दहा शहरांमध्ये मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, आणि सोलापूर यांची निवड करण्यात आली आहे.