शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: महू , शुक्रवार, 15 एप्रिल 2016 (11:23 IST)

मी बाबासाहेबांमुळेच पंतप्रधान

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच एका भांडी घासणा-या आईचा मुलगा भारताचा पंतप्रधान झाला, असे भावोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महू येथे काढले. पंतप्रधान मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेबांचे मध्य प्रदेशातील जन्मस्थळ महू येथे पोहोचले आणि त्यांनी डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले. 
 
महू येथे आयोजित जयंती सोहळ्यात पंतप्रधान मोदी म्हणाले की, बाबासाहेब एक व्यक्ती नाहीत तर एका संकल्पाचे नाव आहे. आपण धन्य झालो की, ज्या महामानवाचा जन्म ज्या भूमीत झाले त्या भूमीचे दर्शन घेण्याची संधी मिळाली. ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील अन्यायाविरुद्ध लढा दिला. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समानता आणि प्रतिष्ठा मिळविण्यासाठी समर्पित केले होते. या वेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हेसुद्धा तिथे उपस्थित होते. 
 
मोदी यांनी या वेळी उपस्थितांशी संवाद साधला. मोदी म्हणाले की, यंदाचा अर्थसंकल्प हा पूर्णपणे ग्रामीण भाग आणि शेतक-यांना समर्पित करण्यात आला आहे. देशातील गरिबांना सुविधा मिळावी म्हणून अनेक नागरिकांनी स्वेच्छेने गॅस सिलेंडरवरील अनुदानाचा त्याग केला त्यांचे कौतुकच करायला हवे, असेही त्यांनी सांगितले तसेच ग्रामउदय ते भारतउदय अभियान अंतर्गत पंतप्रधान मोदी जमशेदपूरहून देशातील सर्व ग्रामसभांना संबोधित करणार आहेत. मोदी म्हणाले की, देशातील १८००० गावांमध्ये वीजच नाही. 
 
या गावांना वीजपुरवठा करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरदेखील तब्बल १८ हजार गावांमध्ये वीज अजून पोहोचली नाही, याबद्दल खंतही व्यक्त केली. मोदी यांनी आपल्या भाषणादरम्यान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची स्तुती केली. त्यांनी चौहान यांना शेतक-यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ करण्याच्या योजनेच्या कामांसाठी शुभेच्छाही दिल्या.