शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|
Last Modified: मुंबई , बुधवार, 27 जानेवारी 2010 (16:30 IST)

मुंबई हल्‍लाः राणेंच्‍या साक्षीची मागणी फेटाळली

मुंबई हल्‍ल्‍यात कोण सहभागी होतं आणि त्‍यांना कोणी-कोणी मदत केली हे महसूल मंत्री नारायण राणे यांना माहीत असून त्‍यांना न्‍यायालयात साक्ष देण्‍यासाठी बोलावण्‍यात यावे ही या हल्‍ल्‍यातील एकमेव जीवंत दहशतवादी कसाबच्‍या वकीलांची मागणी विशेष न्‍यायाधीश एम.एस.टहलियानी यांनी फेटाळली आहे.

कसाबच्‍या वकीलांनी नारायण राणे यांना न्‍यायालयात साक्ष देण्‍यास बोलावण्‍यात यावे अशी मागणी केली होती. हल्‍ल्‍यानंतर मुख्‍यमंत्री निवडीवरून झालेल्‍या वादाच्‍या वेळी राणे यांनी एका पत्रकार परिषदेत या हल्‍ल्‍यात स्‍थानिक पातळीवरून कोणी मदत केली आणि याचे आपल्‍याकडे पुरावे असल्‍याचा दावा केला होता.

राणे यांच्‍या या दाव्‍याचा आश्रय घेत कसाबच्‍या वकीलांनी त्याच्‍या बचावासाठी राणेंची साक्ष नोंदविण्‍याची मागणी केली. त्‍यांच्‍या या मागणीस विशेष सरकारी वकील उज्‍वल निकम यांनी जोरदार आक्षेप घेतला असून राणे यांचे वक्तव्‍य हे राजकीय स्‍टंट असल्‍याने ते नोंद‍वून घेता येऊ शकत नाही हे केवळ वेळखाऊपणाचे ठरेल असा पवित्रा घेतला. न्‍यायालयाने या संदर्भात सुनावणी करताना कसाबच्‍या वकीलांची मागणी फेटाळून लावली आहे.