गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 जुलै 2015 (09:54 IST)

याकूब फाशीवरून थरूर-दिग्गींचा तिळपापड

नवी दिल्ली- मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी याकूब मेमनला फासावर लटकवल्याने काँग्रेस नेते शशी थरूर आणि दिग्विजयसिंह यांचा चांगलाच तिळपापड झाला आहे. केंद्र-राज्य सरकारवर आणि न्यायव्यवस्थेवर ट्विटरवरून ताशेरे ओढत त्यांनी आपला राग व्यक्त केला आहे.
 
याकूबला दिलेली फाशी ही ‘सरकार प्रायोजित हत्या’ असल्याचा गंभीर आरोप शशी थरूर यांनी केला आहे, तर न्यायव्यवस्थेने इतर खटल्यांमध्येही आतासारखीच तत्परता दाखवावी, असा टोला दिग्गींनी मारलाय. त्यांच्या या भूमिकेचा सोशल मीडियावरून खरपूस समाचार घेतला जातोय.
 
याकूब मेमनला फाशी दिल्याने 93च्या मुंबई बॉम्बस्फोटांतील मृत-जखमींना न्याय मिळाल्याची भावना जनमानसांत व्यक्त होत आहे. ही फाशीची शिक्षा सुनावणार्‍या, कायम ठेवणार्‍या न्यायव्यवस्थेचे आणि त्याची अंमलबजावणी करणार्‍या सरकारचे कौतुक होतेय. परंतु, ही फाशी काही मंडळींच्या जिव्हारीही लागली आहे. अर्थातच, त्यात राजकीय नेते आघाडीवर आहेत. धर्मनिरपेक्षता, मानवतावाद वगैरे मुद्दे मांडत ते या फाशीचा निषेध करताहेत. माजी केंद्रीयमंत्री शशी थरूर आणि काँग्रेस नेते दिग्विजयसिंह हे त्यापैकीच दोघे. याकूबच्या फाशीने झालेले दु:ख त्यांनी ट्विटवरून व्यक्त केलेय.
 
शशी थरूर यांचे ट्विट
 
सरकारने एका माणसाला फाशी दिल्याचे ऐकून वाईट वाटले. ही ‘सरकार प्रायोजित हत्या’ आम्हाला मारेकर्‍यांच्या पंक्तीत घेऊन जाते. 
 
फाशी गुन्हेगारी रोखण्याचे काम करते याचा कुठलाच पुरावा नाही. खरे तर वस्तुस्थिती त्याच्या उलट आहे. फाशी म्हणजे एक प्रकारचा बदलाच आहे. हे सरकारचे अपयश आहे. आपल्याला दहशतवादाचा मुकाबला जरूर करायचाय, पण अमानुषपणे फाशी दिल्याने जगात कुठेच दहशतवादी हल्ले थांबलेले नाहीत.
 
दिग्विजय यांचे ट्विट
 
याकूब मेमनला फाशी झाली. दहशतवादाच्या आरोपीला शिक्षा देण्यात सरकार आणि न्यायव्यवस्थेने जी तत्परता दाखवली ती कौतुकास्पद आहे, आदर्श आहे. आता इतर खटल्यांमध्येही जात-पात, धर्म आणि मतांचा विचार न करता ते अशीच कारवाई करतील, अशी आशा वाटते. परंतु, दहशतवादी कारवाया करणार्‍या इतर आरोपींवर ज्या पद्धतीने खटला चालवला जातोय, त्यावर मला संशय आहे. सरकार आणि न्यायव्यवस्थेची विश्वसनीयता धोक्यात आहे.