शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 22 मे 2015 (13:54 IST)

‘एक्सप्रेस वे’वर उतरले विमान

आपत्काळात मोठय़ा रस्त्यांवर लढाऊ विमान उतरवता येईल का?, याची चाचपणी करण्यासाठी गुरुवारी सकाळी 6.40 वाजता उत्तर प्रदेशमध्ये मथुरेजवळ यमुना ‘एक्सप्रेस वे’वर मिराज 2000 हे लढाऊ विमान उतरवण्यात आले. ही चाचणी यशस्वी झाल्याची माहिती भारतीय वायुदलाने दिली. कोणत्याही कारणामुळे विमानतळ वापरण्यायोग्य स्थितीत नसेल तर लढाऊ विमान उतरवण्यासाठी जवळचा मोठा रस्ता हा एक पर्याय असू शकतो असेही वायुदलाने सांगितले.
 
लढाऊ विमान ‘एक्सप्रेस वे’वर उतरवताना कोणत्याही प्रकारची गडबड होऊ नये यासाठी विमान वाहतूक नियंत्रण विभाग, वायुदलाचा सुरक्षा विभाग, मदतकार्य विभाग, पक्षी हटवून आसपासचा परिसर विमान चाचणीसाठी योग्य करणारा विभाग, ‘एक्सप्रेस वे’वरील सुरक्षा विभाग, आग्रा आणि मथुरा येथील जिल्हा प्रशासन आणि पोलीस यांच्यासोबत वायुदलाने समन्वय साधला होता.
 
‘एक्सप्रेस वे’वर लढाऊ विमान उतरवण्याची चाचणी करण्यासाठी वाहतूक विभागाने वाहनांना पर्यायी मार्गावरुन वळवले होते. सुरक्षेचा उपाय म्हणून आयत्यावेळी वाहतुकीत बदल करण्यात आला, त्यामुळे पर्यायी मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
 
सध्या जर्मनी, पोलंड, स्वीडन, दक्षिण कोरिया, तैवान, फिनलंड, स्वीर्त्झलंड, सिंगापूर आणि पाकिस्तानमध्ये विमानतळ बंद पडल्यास लढाऊ विमान उतरवण्यासाठी मोठय़ा रस्त्यांचा पर्याय प्रमुख शहरांमध्ये उपलब्ध आहे. यमुना ‘एक्सप्रेस वे’मुळे दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधील   महत्त्वाच्या शहरांना हवाई संरक्षण पुरवणे वायुदलासाठी सोपे झाल्याची माहिती एका अधिकार्‍याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली.