शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. नवरात्रौत्सव
Written By वेबदुनिया|

अंबेजोगाईची आदिमाया योगेश्वरी

MH Govt
MH GOVT
महाराष्ट्रातील देवीची साडेतीन शक्तीपीठ आहेत. याशिवाय संपूर्ण महाराष्ट्रात आदिमायेची अनेक शक्तीस्थाने आहेत. त्यापैकी एक म्हणजे बीड जिल्ह्यातील अंबेजोगाईची योगेश्वरी. देतासूराचा वध करण्यासाठी देवीला योगेश्वरीचा अवतार धारण करावाला लागला होता, अशी आख्यायिका आहे. तर अंबेजोगाई ग्रामस्थांची ही ग्रामदैवत असून योगेश्वरी हा पार्वतीचा अवतार आहे, असे येथे सांगितले जाते.

योगेश्वरी देवीचे विशेष म्हणजे ही देवी कुमारिका आहे. पार्वतीने 'त्रिपुरसुंदरी'चा अवतार घेतला होता. परळी येथील वैजनाथाशी तिचा विवाह ठरला होता. परंतु त्रिपुरसुंदरीला लग्न करायचे नव्हते. घरच्यांच्या दबावाखाली त्रिपुरसुंदरी आणि सर्व वर्‍हाडी मंडळी 'परळी' गावाजवळ असणार्‍या 'अंबेजोगाई' येथील शिव लेण्यात आले. विवाहमुहूर्ताच्या वेळी त्रिपुरसुंदरीने विवाहास स्पष्ट नकार दिला व कायमची कुमारीका म्हणून येथेच राहिली अशी आख्यायिका आहे.

मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला अर्थात देवीच्या जन्मदिनी येथील मंदिरात नवरात्रौत्सव साजरा केला जातो. तसेच शारदीय नवरात्रातही येथे यात्रा भरत असते.

नवसाला पावणारी देवी म्हणून योगेश्वरी देवीची ओळख आहे. देवीला पानाचा विडा देण्याची परंपरा आहे. नवरातत्रौत्सवात काकड आरती, अष्टमीला शतचंडी हवन करण्याची प्रथा असून, नवमीला पूर्णाहूती असते. दसर्‍याला योगेश्वरी पालखी असते. ढोल ताश्याच्या गजरात गावातून भव्य मिरवणूक काढली जाते.

योगेश्वरीची मूर्ती शेंदरी असून तिचे रूप आक्रमक आहे. नवरात्रौत्सवात देवीला आभुषणांनी चढविले जातात. भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या अंबेजोगाईच्या योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी लाखोभाविक गर्दी करत असतात.