शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. नवरात्रौत्सव
Written By वेबदुनिया|

आदिशक्तीच्या स्तवनाचे नवरात्र

WD
नवरात्र साजरे करण्यामागचे कारण मार्कंडेय पुराणांतर्गत देवी महात्म्यात सांगितले आहे. जगात तामसी व क्रूर लोकांची संख्या वाढून ते इतरांना त्रास देऊ लागतात तेव्हा सज्जनांना त्रासमुक्त करण्यासाठी, त्यांना त्यांचे स्थान पुन्हा मिळवून देण्यासाटी शक्तीदेवता या धरतीवर अवतीर्ण होते. दुष्टांच्या निर्दालनासाठी देवीने अनेक अवतार घेतले. सामान्यजनांना, विद्वानांना तिने पुन्हा सुख प्राप्त करून दिले. तिच्या या कर्तृत्वाबद्दल तिचे स्तवन व स्मरण करण्यासाठी नवरात्र साजरे केले जाते.

एका प्रसंगात देवीनेच सांगून ठेवले आहे, ''मी तुमच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर राहीन. संकटकाळी अनन्यभावाने मला शरण येताच मी प्रकट होऊन तुम्हास दुःखमुक्त करीन मी तुमच्यावर सदा प्रसन्न असावे म्हणून प्रत्येक अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नऊ दिवस घटपूजा, होमहवन वगैरे प्रकारांनी माझे पूजन करावे. माझ्यावर अचल निष्ठा ठेवून संकटसमयी जे माझी करूणा भाकतील त्यांच्या सुखासाठी मी सदैव जपत राहीन'' यावरून नवरात्र पाळण्याची परंपरा निर्माण झाली असावी, असे म्हणण्यास वाव आहे.

WD
नवरात्रातील शास्त्रीय विधी
नवरात्रौत्सव कुणीही साजरा करू शकतो. त्यात कुठलाही वर्णभेद नाही. मात्र, वर्णानिहाय त्याचा विधीही वेगळा येतो. प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना केल्यावर नवमीपर्यंत सप्तशतीचा जप, देवीभागवत श्रवण, अखंडदीप, पुष्पमाला समर्पण, उपोषण, पूर्ण किंवा एकभुक्त व्र, सुवासिनी व कुमारिका यांना भोजन व त्यांची पूजा शेवटच्या दिवशी होमहवन व बळीसमर्पण करावे, असे शास्त्र सांगते.

घटाशेजारी नवधान्ये रूजत घालून त्यांचे विसर्जन केल्यावर त्यांची रोपे प्रसादादाखल शिरी धारण करावे. पंचमीच्या दिवशी उपांगललिता देवीचे व्रत करावे. मूळनक्षत्री सरस्वतीचे आवाहन, पूर्वाषाढाच्या ठिकाणी पूजा, उत्तराषाढा नक्षत्री बलिदान आणि श्रवण नक्षत्री विसर्जन करावे. अश्विन शुक्ल अष्टमीला व नवमीला महातिथी मानतात.