गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. नवरात्रौत्सव
Written By वेबदुनिया|

गरब्याचे बदलते स्वरुप

WD
नवरात्रात देवीची पूजा करुन घटस्थापना होते व नवरात्रीच्या जागरणाला प्रारंभ होतो. आणि सोबतच सुरुवात होते ती दांडियाच्या जल्लोषाला ! ूर्वीचा रास गरबा, दांडियाला धर्मिक स्वरुप होतं त्यामुळे दांडिया मंदिरातून मैदानात आला व त्यात झालेले बदलही लोकांनी उत्साहाने स्विकारले व त्यातुनच सद्ध्याचं “डिस्को दांडिया” चं स्वरुप निर्माण झालं.

पूर्वी दांडिया सणाच्या स्वरुपात साजरा केला जायचा. हडप्पाकालीन संस्कृतीमधे दांडियाचे पुरावे पहावयास मिळतात. त्यावेळी स्त्रिया शेतात पिक आल्यावर नाचत-गात अभिनयासोबत नृत्यही करायच्या. पुढे हाच दांडिया सामाजिक उत्सवाच्या स्वरुपात साजरा केला जाऊ लागला.

पुढे पहा....


WD
साधारणत: पंधरा-वीस वर्षापुर्वी खेळला जाणारा रास गरबा हा धार्मिक स्वरूपाचा होता तसेच त्याचे स्वरुपही छोटेखानीच असायचे. त्यावेळी आजच्या सारखे व्यापक स्वरुप त्यास नव्हते. वस्ती अधिक असलेल्या वसाहतीत, त्या-त्या क्षेत्रापुरते मर्यादित असे रास गरबाचे स्वरुप असायचे व हा रास गरबा रात्र-रात्रभर सतत चालायचा. माँ अंबेच्या देवळाभोवती आणि मध्ये (पूजा करण्यात आलेले छोटे मडके) ठेवून आदीमाता अंबेची आरती, आराधना वगैरे करुन चप्पल न घालता त्याभोवती स्त्री-पुरुष गरबा नृत्य करायचे.

आज ज्या पध्दतीने गरबा आयोजित केला जातो किंवा ज्या पध्दतीने रास गरबा नृत्य केले जाते त्याचा सारासार विचार करता त्यामागे धार्मिक, पवित्र भावनांचा आणि सांस्कृतिक विधींचा लवलेशही सापडणे दिवसेंदिवस दुरापास्त होत चालले आहे. अर्थात आज-कालचे रास गरबाला असणारे धार्मिक पवित्रतेचे वलय बाजूला पडून त्याठिकाणी एका “मस्त मस्त डिस्को दांडियाने” ती जागा घेतली आहे.

WD
नवरात्रोत्सवाला नुकताच प्रारंभ झाला आहे. सर्वत्र कसा आनंद ओसंडून वाहतो आहे. सायंकाळ झाली की, रोषणाईचा झगमगाट सर्वत्र पसरतो आहे… आणि साराच आसमंत पुलंकीत होऊन उठतो आहे. मातेच्या दर्शनाकरीता भाविक भक्ताच्या रांगाच्या-रांगा लागताहेत. आणि याच दिवसात तरुण-तरूणींची देखील एकच धवपळ तेवढ्याच जोमाने चालली आहे. खास नविन विकत आणलेली चनीया चोली, त्याला मॅचींग ग्लॉसी मरुन कलरची किंवा मग गुलाबी कलरची लिप्स्टीक, त्याच शेडची नेलपेंट आणि खास ब्युटिपार्लरमधे जाऊन सेट केलेली केशरचना…अशी सारी जय्यत तयारी सकाळपासून चाललेली आहे. सोबतच रात्रीला रंगलेली दिसावी म्हणुन सकाळीच हातावर काढून घेतलेली मनमोहक मेहंदी देखील बऱ्यापैकी रंगलेली असते…होय आपण बरोबर ओळखलंत…ही सारी जय्यत तयारी आहे ती रात्रीच्या रास गरबा दंडियाची! आणि हो हा सारा खटाटोप केवळ एका रात्रीपुरता नाही बरं काऽऽ… तर अगदी घटस्थापनेपासून तर दसऱ्यापर्यंत सतत चाललेला असतो.

WD
अशा धावपळीमध्ये आपण जर का एखाद्या तरुणीला प्रश्न केला ‘का ग एवढं सारं कशासाठी?’ तर ती नक्कीच आपल्याला शेलकी प्रतिक्रिया देत म्हणेल, कशासाठी म्हणजे काय? वर्षातून एकदाच तर येतो दांडिया…सॉलिड धम्माल येते… दांडिया हातामधे घेवून आणि रींगणामधे जाऊन जरा नाचुन तर बघा…मग कळेल…पाऊले कशी ठेका धरुन नाचायला-थिरकायला लागतात ते …” आणि आपण जर का नटण्या-मुरडाण्याविषयीच बोलत असाल तर मात्र जरा लपून हंऽऽ… मग त्यांचं उत्तर तर ठरलेलंच… “अहो, आजकाल दांडिया म्हणजे केवळ टिपर्‍या हातात घेवून नाचायचे नव्हे तर पुरस्कारांची देखील लयलुट असते. बेस्ट डान्सर, बेस्ट कपल वगैरे… वगैरे…”
थोडं फार तालबध्द नाचता आलं की झालं… दहा दिवसात एक तरी दिवस पुरस्काराची लॉटरी ही लागतेच…आणि आपोआप सारा खर्च वसुल होतो.

WD
रात्र झाली की ‘पंखिडा ओऽऽ… पंखिडा…’ किंवा ‘आज राधा को श्याम याद आ गया…’ अशी सुरांची लकेर आसमंतात उमटते… आणि मंडपाच्या मधोमध असणारं आर्केस्ट्राचं स्टेज, रंगीबेरंगी रोषणाईने सजविलेले सर्कल…आणि हाय-फाय साऊंड सर्व्हिसच्या जोरावरील बिट्स या सर्वांचा मुड कसा रोमांचित होऊन उठतो… आणि हर्षोल्हासामध्ये बिट्स्च्या तालावर पाऊले ठेका धरु लागतात…त्यातल्यात्यात जर उत्साही अन् सरावलेली मंडळी असेल तर ती बिनधास्तपणे सर्कलमधे घुसून नाचायला लागते… ज्या काही मोजक्या नशिबवान लोकांना जोडीदार, पार्टनर मिळालेला असतो ते दांडिया खेळायला सुरुवात करतात… तर ज्यांना पार्टनर मिळालेला नाही किंवा येतो म्हणून सांगुनही अजुन पर्यंत आलेला नाही अशांची अस्वस्थता वाढतच जाते… आणि मग “तारा बिन श्याम मने एक लाडु लागे रेऽऽऽ…” असे दांडिया प्रेम विरह गीत मनातल्या-मनात आळवत असतात. आणि काहींचा तर तोराच ओर असतो ‘कुणी आपणास खास बोलावतो का?’ याची वाट पहात ते रींगणाबाहेरच उभे असतात… आणि सरते शेवट सारे सर्कल पूर्ण भरते…आणि मध्यरात्री या मैफिलीला रंगत येते… दांडिया धम्माल रंगतो… व पहाटेपर्यंत सारखा जल्लोष चाललेला असतो.

रिंगणामध्ये दांडिया खेळ्णाऱ्यांचा जेवढा उत्साह असतो; तेवढाच उत्साह दांडिया बघणाऱ्या प्रेक्षकांचा असतो. आपणास दांडिया खेळता येणार नाही अशी समजूत करून असणाऱ्या व आपणस नाचायचे नाही असे ठाम ठरवून देखील बऱ्यापैकी तयारी आणि नट्टापट्टा करून ही मंडळी उपस्थित असते.

WD
आजच्या दांडियातील आकर्षकपणा, लवचीकपणा, ताल आणि त्याची लय मनाला भावते. आज दांडियामध्ये दिवा, घागर, मटका, हुलाडिया, चुटकी आणि टाकी फारसी पहावयास मिळत नाही. परंतू विविध प्रकारचा आनंदोत्सव असतो. गुजरात मधून महाराष्ट्रामध्ये आलेल्या या दांडियाने तरूण-तरूणींना अगदी वेडं करून सोडलं आहे. त्यांना मोठया प्रमाणात एकत्र बांधून ठेवलं आहे. विविध मंडळे या उत्सवाचे आयोजन मोठया प्रमाणात करीत असतात. मात्र आज या उत्सवातील भक्ती बाजूला सारली जाऊन तिथे दिखाऊ वृत्ती प्रस्थापित होऊ लागली आहे. दांडिया रास म्हणजे केवळ भारी वेशभुषा करून, टिपऱ्या हातात घेऊन विद्युत रोषणाईत, मोठया आवाजात डिस्को दांडियाचे नावाखाली कसल्याही प्रकारचा नृत्य प्रकार करायचा हे प्रमाण वाढीस लागले आहे.