शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By वेबदुनिया|

गोंधळाला यावे....

नवरात्रीचे दिवस आले आहेत. या नऊ दिवसात संपूर्ण भारतात शक्तिदेवतेचं जागरण मांडलं जातं. अंबा, भवानी, दुर्गा, कालीका, रेणूक अशी शक्तिदेवतेची विविध रूपं या रूपांच संकीर्तन ज्या विविध प्रकारांद्वारे केलं जातं त्यातील एक प्रकार म्हणजे गोंधळ. गणांचे दलं जो प्रकार सादर करते तो गोंधळ होय. सोमेश्वराच्या नृत्य रत्नावली या ग्रंथात गोंधळाचा उल्लेख गौडली नृत्य असा आहे. गोंधळ हे विधिनाट्य होय. महाराष्ट्रातील भक्तीसंप्रदायाद्वारे आविष्कृत झालेल्या भक्तीनाटय़ापूर्वी आपणास यातुक्रिया किवा यावात्मक क्रियांमधून आविष्कृत झालेल्या विधिनाटय़ांचा विचार करावा लागेल. आदिवासी संस्कृती आणि ग्राम संस्कृतीत या विधीविधानांचे आपले एक विश्व असून बोहडा, पंचमी, गोंधळ, जागरण, भराड आदी विधिनाटय़ांनी मराठी लोकधर्मात आपला स्वतंत्र ठसा उमटविल्याचे निदर्शनास येते.

गोंधळी रेणुकापुत्र परशुरामाला पहिला गोंधळी मानतात. गोंधळ हा दक्षिण भारतातील अतिप्राचीन देशी नृत्यप्रकार असून त्यात लोकदेवतेचे व भगताचे उन्नयन होत गेले. संबळ, तुणतुणे, मंजिरी या वाद्यांच्या साथीने सादर होणार्‍या गोंधळाचे दोन प्रमुख प्रकार होत. कदमराई गोंधळी म्हणजे तुळजापूरच्या भवानीचे उपासक आख्यानाचा गोंधळ सादर करतात. त्याला 'हरदासी गोंधळ` असेही म्हणतात. गण, गौळण, आख्यान, आरती असा कदमराई गोंधळय़ांनी सादर केलेल्या आख्यानाच्या गोंधळाचा आविष्कारक्रम असतो. रामायण, महाभारत, पुराणातील कथा आख्यानपर काव्याच्या रूपाने गोंधळी सादर करतात. चौका चौकांच्या पदांचे गायन, गायनातच मधूनच सपादणी, संवाद व निरूपण असे गोंधळाचे स्वरूप असते. कदंबांच्या काळापासून गोंधळ महाराष्ट्रात प्रचलित असून कोल्हापूर, माहूर, तुळजापूर, पुणे, सातारा, सांगली, मराठवाडयातील औरंगाबाद, परभणी, बीड आदी परिसरात रेणुराई व कदमराई गोंधळयांची परंपरागत घराणी आहेत. 'गोंधळ` या विधिनाटय़ाने प्रायोगिक रंगभूमीलाही समर्थ योगदान दिले आहे. गोंधळ हे विधिनाट्य बाराव्या-तेराव्या शतकातही इतके लोकप्रिय होते, की भागवत -संप्रदायी संतांनी 'गोंधळ` हे विधिनाट्य व 'गोंधळी` ह्या लोकसंस्कृतीच्या उपासकांवर अनेक रूपके केली आहेत. त्यातील एक रूपक असे.

सुदिन सुवेळ तुझा मांडिला गोंधळ
पंचप्राण दिवटय़ा दोन्ही नेत्रांचे हिल्लाळ
तू विटेवरी सखये बाई करी कृपा