शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. नवरात्रौत्सव
Written By वेबदुनिया|

नवसाला पावणारी भगवती देवी

WD
येथे तीनशे वर्षापूर्वी स्वंभू भगवती देवीची प्रतिष्ठापना केलेले मंदिर असून कडक स्वभावाची व नवसाला पावणारी तडवळेची भगवती देवी अशी ख्याती आहे.

शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त दरवर्षी नऊ दिवस यात्रा उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा होत आहे. भोगावती नदीकिनारी भगवती देवीचं प्राचीन मंदिर आहे. देवी माहात्म्याविषयी आख्यायिका आहे. 300 वर्षांपूर्वी दक्षिणेकडे वाहणार्‍या भोगावती नदीपात्रात महंत बल्लाळ नावाची व्यक्ती दररोज प्रात:काली स्नानसंध्या, पूजापाठ करत असे. एकदा स्नान करत असतानाच त्यांच्या हाती मूर्ती आली. त्या मूर्तीची भोगावती नदीतील भगवती देवी म्हणून प्रतिष्ठापना केली. सवाद्य उत्सव गावात साजरा करण्यात आला. आजपावेतो नवरात्रीमहोत्सवात दरवर्षी हजारो भाविक भगवती देवीच्या दर्शनाला दुरून येतात.

भगवती देवीची मूर्ती शाळीग्रामसारखी मऊ चल स्वरूपाची व दोन फूट उंचीची रेखीव आहे. मूर्ती अष्टभुजा आहे. ती सिंहासनारूढ होऊन दैत्याचा संहार करताना दिसून येते. देवीच्या उजव्या पायाजवळ तीन दैत्य शरण आल्याचे दिसत आहे. देवीच कानात, गळ्यात, भुजात, कमरेला, डोक्यावर, पायात विविध अलंकार आहेत. अशी देखणी स्वंभू मूर्ती असून भगवती देवीचा मुख्य महोत्सव विजादशमीदिवशी भरतो. देवीचा छबिना काढला जातो. सर्व ग्रामस्थ हिरीरीने उत्सवात भाग घेतात. अशी ही नवसाला पावणारी व कडक स्वभावाची देवी रक्षणकर्ती म्हणून ओळखली जाते.