गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By

नारायणी नमोस्तुते

‘सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, 
 
शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते!’
 
हे कल्याणी, आमची सर्व मनोरथे सर्वार्थाने पूर्ण करणार्‍या अशा तुला मी वंदन करत आहे. जिथे स्त्रियांची पूजा केली जाते तिथे देवतासुद्धा रमामाण होतात. आणि जिथे त्यांची पूजा केली जात नाही तेथील सर्व क्रिया विफल होतात. अशी ज्या ठिकाण्याची आख्यायिका आहे, अशा भारत देशात आपण राहतो. 
 
वास्तविक पाहता इतिहास याला साक्षी आहे. जेव्हा जेव्हा महाकठीण प्रसंग येतात तेव्हा समाजाच्या पाठीशी स्त्री ही एक शक्ती म्हणून उभी असते. देवतासुद्धा याला अपवाद नव्हत्या. ज्यावेळी देवांचा राजा इंद्र व दानवांचा राजा महिषासुर या दोघांमध्ये युद्ध चालू होते, त्यामध्ये देवांचा पराभव होऊन महिषासुर देवाधिपती इंद्र बनला. सूर्य, इंद्र, अग्नी, वायू, चंद्रमा, यम, वरुण आदी देवतांचे अधिकार हिरावून महिषासुर स्वत: सर्वाधिकारी बनला. सर्व देवांना महिषासुराने स्वर्गातून हद्दपार केले. पराभूत देव भगवान शिव व विष्णू यांना शरण गेले. त्यावेळी अनंत तेजशिखा उत्पन्न झाल्या व सारे तेज एकवटून नारी रूप आविष्कृत झाले. तीच महालक्ष्मी देवी होय. जिचे वाहन सिंह होते, अशा भगवतीने घनघोर युद्ध करून आपल्या पायाखाली महिषासुराचा कंठ चिरडून त्याचा शिरच्छेद केला, अशाप्रकारे जेव्हा पाशवी शक्तीचा नायनाट करायचा असतो तेव्हा तेव्हा स्त्री रूपाला शरण जावे लागते. 
 
पुराणातील काही महान स्त्रियांचे दाखले सुद्धा आपण देऊ शकतो. मैत्रेयी ही याज्ञवल्क्य ऋषींची द्वितीय पत्नी होती. वेदांच्या प्रचंड अभ्यासामुळे  तिला ‘ब्रह्मवादिनी’ म्हणत. खरं तर याज्ञवल्क्य ऋषींशी तिला विवाह करायचा नव्हता. परंतु आधत्मिक ज्ञान ऋषींच्या सानिध्यात राहून तिला वाढवाचे होते. त्यासाठी तिने ऋषींची प्रथम पत्नी कात्यायनी हिच्याकडून आज्ञा घेऊन याज्ञवल्क्य शिष्या म्हणून साधना केली. याचप्रमाणे गार्गी एक पुरातन विचारवंत स्त्री, इंग्रजीमध्ये ‘नॅचरल फिलॉसॉफर’ असा तिचा उल्लेख आहे. गार्ग्य  वंशात तिचा जन्म झाल्यामुळे तिचे नाव गार्गी असे होते. जनक राजाच्या नवरत्नांपैकी हे एक रत्न होते. तिने खूप सुभाषित संग्रह लिहिले होते. ज्याला गार्गीसंहिता म्हणून ओळखले जाते. अशा या विचारवंत गार्गीने याज्ञवल्क्य ऋषींनासुद्धा त्यांच्याच ‘आत्मा’ या विषयाच्या लेखनाला आव्हान केले होते. 
 
लोपामुद्रा ही अशीच एक महान स्त्री जिचासुद्धा एक महान विचारवंत म्हणून इतिहासात परिचय आहे. विविध प्राण्यांकडून त्यांचे सुंदर अवयव घेऊन अगस्ती ऋषींनी लोपामुद्रेची निर्मिती केली होती. पुढे ऋषींबरोबर तिचा विवाह होऊन त्या दोघांनी मिळून वेदांचा अभ्यास केला आणि ‘ललितासहस्त्र’ नामाचा प्रचार केला. म्हणून तिला ‘वरप्रदा व कौशिटकी’ या नावानेसुद्धा ती ओळखले जाते. अशाप्रकारे पुराणातील काही स्त्रिांकडून आपल्याला प्रेरणा घेता येईल. प्रत्यक्ष-अप्रत्क्षपणे पुराणातील या महान विचारवंत स्त्रियांचा, महिलांचा शिक्षणातील सहभाग फार मोठा आहे. त्याचप्रमाणे काही उदाहरणे जी आपल्याला माहीत आहेत अशा पंडिता रमाबाई ज्या ब्राह्मण वंशात जन्माला आल्या  व ºख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. पंडिता रमाबाई यांनी स्त्री-मुक्तीची मोठी चळवळ चालवली. इंग्लंडला गेल्यावर बायबलचा सखोल अभ्यास केला. उच्चवर्णी विधवा स्त्रियांना आश्रय देण्याचा वसा त्यांनी घेतला होता. कोलकाता या ठिकाणी संस्कृतवरची बरीच प्रवचने केली त्यामुळे त्यांना ‘पंडिता सरस्वती’ ही पदवी मिळाली. अशा या पंडिता रमाबाई यांनी इंग्लंडला गणित-शास्त्र या विषयांचे ज्ञान घेतले व संस्कृत विषयाच्या   प्राध्यापिका म्हणून काम केले. मुक्ती मिशन तसेच कृपासदन, शारदा सदन अशाप्रकारच्या वसाहती त्यांनी पुण्याच्या आजूबाजूला वसवल्या होत्या. स्त्री-मुक्तीच्या कार्यात पंडिता रमाबाईंचा फार मोठा वाटा होता. 
 
डॉ. आनंदीबाई जोशी या सुद्धा त्याच काळातील पहिल्या ‘महिला डॉक्टर’ होय. परदेशी जाऊन एम.डी. ही मेडिकलची पदवी घेणारी 18व्या शतकातील पहिली महान स्त्री होती. अशा प्रकारच्या महत्त्वाकांक्षी स्त्रियांमुळे ज्ञानाची गंगा उगम पावली होती. तर सावित्री फुले यांच्यासारख्या ज्योतीमुळे ही गंगा घरोघरी, दारोदारी पोहोचली होती. ज्यावेळी एका स्त्रीने शाळेत शिकवणे हा चमत्कार होता त्यावेळी सावित्रीबाई पुण्यासारख्या ठिकाणी शाळेत शिकवायला जात असत. त्यावेळी कर्मठ सनातन्यांनी त्यांना छळायला सुरूवात केली. त्यांनी एकही पाऊल मागे घेतले नाही. ‘स्त्रियांकरिता व अस्पृश्यांकरता शाळा चालवणे, बालहत्या प्रतिबंध गृह काढून विधवा व त्यांच्या अपत्यांना आईची माया देणे, उच्चवर्णीय स्त्रिांना वपन करून विद्रूप करण्याविरूद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणणे.’ अशा प्रकारचे कार्य चालू ठेवले. दुष्ट रूढी मोडण्यास जे धैर्य लागते ते सावित्रीबाईंनी या काळात दाखविले. अशाच कितीतरी महान स्त्रियांचा अंश आजच्या आपल्यामध्ये आहे.
 
सायली जोशी