गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: शनिवार, 31 जानेवारी 2015 (12:59 IST)

फोनची बॅटरी चालता-बोलता रिचार्ज करा

फोनची बॅटरी डिस्चार्ज झाल्यानंतर तुम्ही सर्वात जास्त अस्वस्थ होतात, कारण तुमचा बाहेरील जगाशी संपर्क तुटतो, वेळ निघून गेल्यावर अनेकांचे फोन येतात आणि तुमचा फोन बंद होता, अशी विचारणा होते. यामुळे आपली कामं वेळेत होत नाहीत आणि याचा सहज फटका आपल्याला बसतो.
 
पण आता लवकरच तुमची ही समस्या मिटणार आहे. तुम्ही जितके अंतर चालाल, तितकी अधिक वीजनिर्मिती करणारे एक तंत्रज्ञान रॉयल महाविद्यालयातील बारावीच्या विद्यार्थ्यांनी विकसित केले आहे. 
 
चपलेत बसवलेल्या प्लेटस्च्या मदतीने पिझो इलेक्ट्रिसिटी पद्धतीने वीजनिर्मिती करणारा हा प्रकल्प भविष्यात केवळ मोबाइलच नव्हे तर, अनेक इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांसाठी ‘ऊर्जादायी’ ठरणारा आहे. 
 
डोंबिवली युवक एज्युकेशनल ट्रस्ट संचलित रॉयल महाविद्यालयातील बारावीच्या विज्ञान विभागातील इलेक्ट्रिकल विषयातील सूरज तिवारी आणि हर्षित राय या विद्यार्थ्यांनी साकारलेला हा प्रकल्प तालुकास्तरीय प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे. बारावीच्या पुस्तकातील ‘पिझो इलेक्ट्रिसिटी’विषयीच्या माहितीच्या आधारे शिक्षक नलीन मौर्य यांच्या मार्गदर्शनाखाली या दोघांनी हे तंत्रज्ञान तयार केले आहे. 
 
प्रत्येक व्यक्ती दिवसाला सरासरी 7 हजार फूट चालते. ती ऊर्जा या संयंत्रात वापरण्यात आली आहे. चपलेत बसविण्यात आलेल्या प्लेटस्वर चालल्यानंतर दाब येताच त्यातून निर्माण होणार्‍या विजेचे एसी टू डीसीमध्ये रूपांतर करून ती साठवून ठेवली जाते. प्रत्येक पावलाला 30 व्होल्टची वीजनिर्मिती होते, असे या तंत्रज्ञानाचे स्वरूप आहे. 
 
विशेष म्हणजे, चपलेतील सोलच्या खाली प्लेटस् टाकून अशी ‘वीजनिर्मिती’ सुरू करता येत असल्याने त्यासाठी कोणत्याही विशेष चपलांची वा बुटांची गरज नाही.