गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आयटी
  4. »
  5. मोबाईल
Written By
Last Modified: गुरूवार, 1 मे 2014 (12:07 IST)

मस्त स्वप्नांचा अनुभव देईल ड्रीम ऑन अँप

मस्त स्वप्न पडले तर सकाळी उठताना एकदम फ्रेश वाटते आणि मूडही आनंदी असतो याचा अनुभव आपण प्रत्येकाने घेतलेला असतो. मात्र स्वप्न कोणते पडावे हे आपल्या हाती नसते व त्यामुळे दररोजच स्वीट ड्रीम्स पाहणे शक्य होत नाही. 
 
आता या समस्येवर संशोधकांनी उत्तर शोधले आहे. त्यांनी असे एक अँप विकसित केले आहे जे माणूस झोपतो तेव्हा त्याच्यावर नजर ठेवते आणि स्वप्न पडत असेल तर ते स्वप्न मस्त असावे यासाठी आवश्यक ते आवाज निर्माण करते. 
 
संशोधकांनी हे आवाज निवडताना अतिशय काळजी घेतली आहे. स्वप्नात जंगलातील मस्त भटकंती, समुद्रकिनारी लोळण्याचा आनंद या आवाजांमुळे मिळू शकतो. हर्डफोर्डशायर विद्यापीठातील प्रो. रिचर्ड वाईजमन यांनी हे अँप विकसित करणार्‍यांना मदत केली असून या अँपचा युजरवर खरंच काय परिणाम होतो याचे दोन वर्षे निरीक्षण केले आहे. 
 
आतापर्यंत हे अँप 5 लाखाहून अधिक युजरनी वापरले असून त्यातून जमा झालेल्या डेटानुसार चांगल्या स्वप्नांचा माणसाच्या मन:स्थितीवर नक्कीच अनुकूल परिणाम होतो असे स्पष्ट झाले आहे. स्वप्ने पडण्याचे प्रमाण पौर्णिमेच्या काळात अधिक असते व या काळातील झोप अस्वस्थ असते हेही या अभ्यासातून दिसून आले आहे. 
 
मात्र या काळातील स्वप्नेही चांगली असतील तर माणसाचा मूड चांगला राहतो आणि त्यामुळे त्याची कार्यक्षमता वाढते असेही या अध्ययनात दिसून आले आहे. डिप्रेशनमध्ये जाणार्‍यांसाठी हे अँप वरदान ठरू शकेल असेही संशोधकांना वाटते आहे.