बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 मे 2015 (12:44 IST)

मोबाइल ‘स्विच ऑफ’ची आवश्यकता नाही

स्मार्टफोन हा आता आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. त्यामुळे तो सुस्थितीत असणे आणि त्याची नियमित देखभाल ठेवणे, हेसुद्धा एक महत्त्वाचे काम असते. मात्र, पुरेसे तांत्रिक ज्ञान नसल्याने स्मार्टफोनच्या देखभालीबाबत अल्पावधीतच अनेक गैरसमज रूढ झाले आहेत. ‘रोज रात्री मोबाइल स्विच ऑफ केल्याने बॅटरीचे आयुष्य वाढते,’ हा सुद्धा असाच एक गैरसमज आहे. फोन स्विच ऑफ केल्याने बॅटरी कार्यक्षमतेवर कुठलाही परिणाम होत नाही, असे एका संशोधनात आढळून आले आहे.
 
‘स्मार्टफोनच्या मेंटेनन्ससाठी तो रोज रात्री बंद करण्याची काहीही आवश्यकता नाही,’ असे मत ‘आयफिक्सइट’ या कंपनीचे संस्थापक काइल वियेन्स यांनी म्हटले आहे. वियेन्स यांच्या मते, प्रत्येक बॅटरीला ठराविक आयुष्य असते. त्या बॅटरीचा जितका जास्त उपयोग होईल, तितके तिचे आयुष्य कमी होते. प्रत्येक बॅटरीचे आयुष्य ‘संपूर्ण चार्ज ते संपूर्ण डिस्चार्ज’ अशा चक्रात (सायकल्स) बांधलेले असते. सामान्यपणे अशा 300 ते 500 सायकल्स पूर्ण झाल्या की बॅटरीची कार्यक्षमता कमी होऊ लागते. शंभर टक्के चार्ज झालेल्या बॅटरीचा अगदी थोडा वापर झाला आणि नंतर ती पुन्हा चार्ज केली तरीही ते एक पूर्ण चक्र म्हणून गणले जाते. पन्नास टक्के चार्ज झालेली बॅटरी पुन्हा 100 टक्के चार्ज झाली तर ती अर्धी सायकल मोजली जाते. रात्री तसेही आपण मोबाइलचा वापर करत नसल्यामुळे बॅटरी कार्यप्रवण नसते. त्यामुळे रात्री मोबाइल स्विच ऑफ करण्याची आवश्यकता नसते.
 
‘तुम्ही फोनचा वापर कसा करता, यावर बॅटरीचे आयुष्य अवलंबून असते,’ असे वियेन्स म्हणतात. मोबाइलचा उपयोग सतत व्हिडिओ पाहण्यासाठी, गाणी ऐकण्यासाठी किंवा गाडीत जीपीएस पाहण्यासाठी होत असेल, तर बॅटरी फार काळ टिकणार नाही. तसेच बॅटरी सातत्याने गरम वातावरणात ठेवली जात असेल तरीही तिला धोका संभवतो.
 
बॅटरीचे आयुष्य अधिक वाढवायचे असेल तर नियमित कालावधीनंतर ती पूर्णपणे ‘ड्रेन’ करावी. स्मार्टफोन बंद होऊ द्यावा आणि नंतर पुन्हा 100 टक्के चार्ज करावा. वर्षातून एकदा असे केल्यास बॅटरीचे आयुष्य वाढण्यास नक्की मदत होते, असे वियेन्स यांचे म्हणणे आहे.