शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. न्यूजमेकर्स
Written By अभिनय कुलकर्णी|

रिपाइंच्या नावेतून काँग्रेसी प्रवास

ND
ND
रिपाइंच्या नावेत स्वार होऊन मन आणि विचाराने प्रवास मात्र काँग्रेसच्या वाटेने करायचा ही रा. सु. गवई यांनी चालविलेली परंपरा आज त्यांचे पुत्र डॉ. राजेंद्र गवई यांनीही कायम ठेवली असल्याचे सध्याचे चित्र आहे. म्हणूनच स्वतःला रिपब्लिकन नेते म्हणून घेणार्‍या डॉ. गवई यांनी ऐनवेळी रिपब्लिकन ऐक्याला तडा देत आपला वेगळा प्रवास असल्याचे संकेत दिले आहेत. त्यांचा हा वेगळा प्रवास काँग्रेसच्याच वाटेने सुरू आहे, हे सांगायला नको!

रा. सु. गवई हे सलग तीन दशके स्वतःला रिपाइंचे नेते म्हणवून घेत आले आहेत. पण, मन आणि विचाराने ते कधीच रिपाइंचे राहिले नाहीत. त्यांचे शरीर तेवढे रिपाइंत राहिले. रिपाइंचे घोंगडे पांघरून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत काँग्रेसी नेत्यांशी जवळीक साधली आणि स्वतःचा जमेल तेवढा फायदा करून घेतला. केरळच्या राज्यपालपदी आजही ते विराजमान आहेत यामागे हेच एकमेव कारण आहे. स्वतःला रिपाइंचे म्हणवून घ्यायचे आणि काम मात्र काँग्रेससाठी करायचे हा गवईंनी तीन दशके गिरविलेला कित्ता आज त्यांचे सुपुत्र डॉ. राजेंद्र गवई यांनीही गिरविला असल्याचे राजकीय वर्तुळात स्पष्टपणे बोलले जात आहे.

ज्या-ज्या वेळी स्वतःच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आला त्या प्रत्येक वेळी स्थानिक काँग्रेसी नेत्यांवर आगपाखड करून रा. सु. गवई मोकळे झाले आहेत. आपण काँग्रेसच्या किती विरोधात आहोत, हे रिपब्लिकन जनतेला दाखविणे एवढाच त्यांचा यामागे हेतू राहिला आहे. आपला नेता काँग्रेसवर संतापला हे पाहून रिपब्लिकन जनतेलाही बरे वाटायचे. पण, आजवर ते सोनिया गांधी किंवा दिल्लीतील बड्या नेत्यांच्या विरोधात कधीच एक शब्दही बोलले नाहीत. स्थानिक नेत्यांविरोधात बोलताना केंद्रीय राजकारणाचा प्रवास मात्र त्यांनी काँग्रेसी नेत्यांसोबतच केलेला आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आज डॉ. राजेंद्र गवई यांनी वाटचाल सुरू केली आहे. रिपब्लिकन ऐक्याला सुरुवात झाल्यानंतर डॉ. गवई या ऐक्यात सहभागी झाले. आपण ऐक्याचे स्वागतच करतो असेच संकेत त्यांनी यातून दिले होते. पण, नंतर लगेच त्यांनी स्वाभीमानाची भाषा वापरून ऐक्याच्या चालत्या गाडीतून पाय बाहेर काढला. म्हणजे, ऐक्याच्या विरोधात नाही हे संकेत देताना ऐक्य होऊ द्यायचे नाही असाही बंदोबस्त डॉ. गवई यांनी केला. मातब्बर राजकारण्यांचा मुलगा म्हणून डॉ. गवई यांनीही एकाच दगडात दोन शिकारी केल्या असेच आता म्हणावे लागेल.