गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. ऑस्कर
Written By वेबदुनिया|

स्लमडॉगच्या निमित्ताने...

-संदीप रॉयचौधरी (न्यूयॉर्क)

IFMIFM
तसं न्यूयॉर्क शहरात चार पावलं चालल्यानंतर एखादं भारतीय रेस्टॉरंट सापडेल. तिथे काळे आणि गोरे लोक अमेरिकी लंच आणि डिनरसाठी रांगेत उभे रहाण्यात कमीपणा मानत नाहीत. भारतीय मसाले, मिठाई व किराणा दुकानेही तिथे भरपूर आहेत. नव्या अनिवासी भारतीयांत कॉलेजची तरूण-तरूणी, आयटी प्रोफेशनल्स बरेच आहेत. काही भाग तर मिनी इंडिया म्हणून ओळखले जातात. पण भारतीय कला संस्कृती म्हटली की सामान्य अमेरिकी लोकांना साडी, सलवार कुर्त्याची दुकाने आणि धंदडततड संगीत एवढंच डोळ्यासमोर येते.

खरं तर सत्यजीत राय यांनी १९५५ मध्ये पथेर पांचालीसारखा चित्रपट युरोप व अमेरिकेतील बुद्धिजीवी प्रेक्षकांपुढे आणला होता. पुढे शशी कपूर व कानराड रूक्सचा सिद्धार्थ (१९७२), प्रख्यात चित्रपटकार डेव्हिड लीन यांचा पॅसेज टू इंडिया (१९८४) व मीरा नायरचा सलाम बॉम्बे (१९८८) या चित्रपटांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले.

पण मास अपील असलेले चित्रपट पाश्चिमात्य प्रेक्षकांसमोर सादर करण्यात भारतीय चित्रपट दिग्दर्शक अपयशी ठरले. त्यादृष्टीने त्यांनी कधी विचारच केला नाही. बराच कालावधीनंतर २००१ मध्ये मीरा नायरचा मान्सून वेडिंग हा चित्रपट आला आणि तो अमेरिकेत चांगलाच गाजला. अमेरिकी प्रेक्षकांना बॉलीवूडच्या स्टिरीओ टाईप परिप्रेक्ष्याबाहेरचे दाखविणारा हा सिनेमा होता.

सामान्यपणे अमेरिकन मंडळी भारतीय सिनेमाला म्हणजे टिपीकल बॉलीवूडपट असेच समजतात. तेथील समीक्षकही भारतीय चित्रपट म्हणजे म्युझिक टेलिव्हिजनची मोठी आवृत्ती असे समजतात. हे चित्रपट नसून संगितिका आहेत, असेच जणू त्यांचे म्हणणे असते.

IFMIFM
दुर्देवाने मान्सून वेडिंगनंतर तो टेम्पो कायम ठेवणारा चित्रपटच आला नाही. मध्यंतरी ब्रिटनमधील चित्रपटकर्मी गरिंदर चढ्ढा यांची बेंड इट लाईक बेकहॅम ही फिल्म आली. ती अमेरिकेतही खूप चालली. पण भारतीय सिनेमा म्हणून त्याला ओळख मिळाली नाही. एकीकडे भारतीय सिनेमा अमेरिकी प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित करण्यास अपयशी ठरत होता. दुसरीकडे यश चोप्रा आणि सुभाष घई यांनी न्यूयॉर्कमध्ये दोन ऑफिसेस उघडली. पण ती आपल्या साचेबद्ध चित्रपटांच्या प्रसाराकरीता.

पण गेल्या काही वर्षात भारताची प्रतिमा खूपच बदलली. भारतीय वस्तूंप्रमाणेच अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, शाहरूख खान, ऐश्वर्या राय ही नावे येथे विकली जाऊ लागली. याचा फायदा उचलून मुंबईतल्या चित्रपटकर्त्यांनी अनिवासी भारतीयांच्या भावनांना हात घालत त्याला देसी तडका दिला आणि तो पदार्थ विकला. यात आदित्य चोप्रा, करण जोहर हे आघाडीवर होते.

अमेरिकन ग्लॅमर, फॅशन आणि चकचकाटात भारतीय संस्कृती मिसळून दिली आणि ही डिश छान विकली. ही डिश चविष्ट वाटल्याने चालू लागली. पूर्वी न्यूयॉर्कमध्ये एका चित्रपटगृहात आठवड्याला हिंदी चित्रपटांचा एक शो होत असे. आता चार थिएटरमध्ये हिंदी चित्रपट नियमितपणे दाखविले जातात. पण अमेरिकी प्रेक्षक त्याला नसतात. भारत म्हटला म्हणजे त्यांना इंडियन क्युझिन एवढेच माहित असते. जास्तीत जास्त ते बॉलीवूड म्युझिक आणि अमजद अली खान यांची सरोद तेवढी ऐकतात.

पण स्लमडॉग मिलिनियरने अमेरिकी प्रेक्षकांना भारताविषयीची आपली समजूत बदलण्यास भाग पाडले आहे. इंग्रजी व हिंदीतला हा चित्रपट १२ नोव्हेंबरला अमेरिकेतील निवडक काही चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. मुंबईतील दहशतवादी हल्ल्याने सगळ्यांचे लक्ष मुंबईकडे वळाले त्याचा फायदा या चित्रपटालाही मिळाला आणि २६ डिसेंबरला तो पूर्ण अमेरिकेत रिलीज करण्यात आला.

चित्रपटाची लोकप्रियता एखाद्या वादळासारखी पसरली गेली. न्यूयॉर्क टाईम्ससारख्या वर्तमानपत्राने आणि देशातील अनेक समीक्षकांनी त्याचे कौतुक केले. सहाजिकच त्याची चर्चा प्रेक्षकांमध्येही होऊ लागली.

मीही माझ्या एका अमेरिकी मित्राच्या सांगण्यावरून हा चित्रपट पाहिला. थिएटरमध्ये अमेरिकी प्रेक्षकांना पाहून मी हैराण झालो. चित्रपटाशी ते खूपच जोडले गेल्याचे लक्षात आले. त्यातच ११ जानेवारीला त्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाल्यानंतर तर तो आणखी चालायला लागला. संगीतकार ए. आर. रहमान हा पुरस्कार मिळविणारा पहिला भारतीय बनला.

बदलत्या काळातील बदलता भारत या चित्रपटाने दाखविला आहे. वास्तव आणि कल्पनारम्यता यांच्या सीमारेषेवरचे काही तरी हा चित्रपट दाखवतो. वास्तवाने माणूस अस्वस्थ होतो आणि त्याचवेळी कल्पनारम्यतेने त्याचे मनोरंजनही होते. विकास स्वरूप यांच्या क्यु अँड ए या कादंबरीवर आधारीत या चित्रपटाला ब्रिटनचे प्रख्यात दिग्दर्शक डॅनी बॉयल यांनी अतिशय छान दिग्दर्शित केले.

सायमन बियुफेने अतिशय खुबीने पटकथा विणली. तार्किकता लावायला वेळ मिळणार नाही याची दक्षता बॉयल यांनी घेतली आणि चित्रपट एकदम आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला. त्याच्या या सराईतपणामुळेच पाश्चिमात्य प्रेक्षकांना तो आवडला. भारतीय प्रेक्षकांना ज्यात फारसे काही वाटत नाही, तेच नेमके पाश्चात्यांना आवडत असावे.

रहमानचे संगीत अद्वितीय आहे. दुःख, निराशा, विषाद अशा भावनांबरोबर रहमानने संगीताचे हिंदोळे प्रेक्षकांना आपल्याबरोबर घेऊन जातात. त्याच्या या संगीतासाठी त्याला ऑस्कर मिळणे पक्के आहे.

सामाजिक, राजकीय व आर्थिक व्याभिचारातून उत्पन्न झालेल्या कुंठीतावस्थवेर स्लमडॉग मिलिनियर ही एक टोकदार प्रतिक्रिया आहे. हॉलीवूडी हातांनी हाताळल्याने हा चित्रपट चांगला झाला हे खरे. पण पाश्चात्य जगतात कसा चित्रपट हवा असतो याचा मासलाही आहे. मसालेदार भारतीय चित्रपट बनविणाऱ्यांसाठी हा इशाराही आहे.

या चित्रपटाला ऑस्करसाठी निवडल्यास फारसे आश्चर्य वाटणार नाही. पटकथा, दिग्दर्शन, संगीत व सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे गोल्डन ग्लोब मिळाल्यानंतर आता हा चित्रपट ऑस्कर पटकावण्याच्या तयारीत आहे.
(लेखक कवी आणि स्वतंत्र्य भाष्यकार आहेत.)