गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. करिअर
  4. »
  5. स्वतःला घडवताना
Written By वेबदुनिया|

परीक्षा - मुलांची.. की आई-बाबांची?

ND
टेन्शन वाढलेलं. पारा चढलेला. खेळणं बंद. गप्पा बंद. केबल काढलेली. पहाटे उठा. रात्र रात्र जागा. आई काळजीत. बाबा काळजीत. मुलं धास्तावलेली.

मुलांच्या परीक्षेत पालकांची भूमिका म्हटली तर काहीच नाही आणि म्हटली तर खूप आहे. आपल्या मुलांच्या मनावर परीक्षा म्हणजे शिक्षा असा समज कोरू पाहणारे पालक मुलांना मदत नाही, तर त्यांचा घात करत असतात. त्यापेक्षा त्यांची या काळातली प्रत्येक कृती, उक्ती जर मुलांना समजून घेणारी, त्यांच्या कलानं घेऊन मुलांना त्यांचा अवकाश देणारी असेल, त्यांना सहकार्य करणारी असेल तर मुलांमध्येही बळ येतं, आपल्या क्षमतांची कसोटी लावण्याची जिद्द त्यांच्यात आपोआप उतरते. पण एक आहे, परीक्षेचा निकाल आपल्या मुलांच्या कुवतीनुसारच लागणार आहे आणि तो जर आपण मनमोकळेपणानं स्वीकारू शकलो, तर मुलंही भविष्यात प्रत्येक परीक्षेला हसत-खेळत सामोरी जातील, प्रत्येक निकालाला खिलाडूवृत्तीनं स्वीकारतील. प्रत्येक जण काही टॉपला जाऊ शकत नाही. पण प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात यशस्वी मात्र नक्कीच होऊ शकतात आणि त्याची तयारी करण्याची संधी आपल्या मुलांना परीक्षा देत असते. आता परीक्षांचा हंगाम आहे. तो गंभीर भूमिकांच्या झळांनी तापवायचा की हलका-फुलका, छान हवाहवासा गारेगार ठेवायचा हे पालक म्हणून सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. एव्हाना तुमची मुलं परीक्षेच्या तयारीला लागलीच असतील तेव्हा तुम्ही ही तुमच्या मनातून परीक्षेचं टेन्शन झुगारण्याची तयारी सुरू करायला हवी. हो ना..!
अभ्यास समजून-उमजून की मारूनमुटकून..?
१) मुलं जर घोकंपट्टी करून विषय लक्षात ठेवायचा प्रयत्न करत असतील, तर त्यांना तो विषय समजून घेण्याचा आग्रह करा. परीक्षेच्या खूप आधी मुलांना काय सोप्पं वाटतंय काय अवघड वाटतंय, एखादा विषय समजत नसेल तर तो का समजत नाही? हे त्यांच्याशी संवाद साधून समजून घ्या. त्याबाबत त्यांना त्यांच्या शिक्षकांची मदत घ्यायला लावा, जमत असल्यास आपणही त्यांना सहकार्य करू शकतो.
२)एकदम पोळीचा घास घ्यायला गेलो तर घास घशात अडकणारंच तेव्हा आपल्या मुलांना विषयाचं, पुस्तकांचं एकदम दडपण न घेता तुकड्या-तुकड्यानं अभ्यास करायला लावा.
३)परीक्षांना अवधी असताना आपण नेमून दिलेल्या विषयांच्या क्रमानं मुलांना अभ्यास करण्याची सक्ती करू नये. तर मुलांनी त्यांना सोप्प्या वाटत असलेला विषयांपासून सुरुवात केली तर अवघड वाटणार्‍या विषयाची गोडी, आवड किंवा अभ्यास करण्याची इच्छा त्यांच्यात आपोआप निर्माण होईल.
४)परीक्षेच्या आदल्या दिवशी मुलांनी उजळणी किंवा सराव करण्यावर भर द्यायचा असतो त्यांच्यावर पुस्तक किंवा गाइड घेऊन पाठांतर करण्याची सक्ती करू नये.
५)मुलांच्या अभ्यासाच्या बाबत पालकांनी लवचीक भूमिका घ्यावी. जेव्हा त्याला विश्‍वास असतो की आपला अभ्यास झाला आहे तेव्हा त्यांचं म्हणणं आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे. आपण‘ असा कसा वार्षिक परीक्षेचा तुझा अभ्यास चार तासांत संपला’ असं म्हणून बळजबरीनं त्याला अभ्यास करण्याचा आग्रह करू नये. यामुळे ना त्याचा अभ्यास होतो ना त्याला हवा असलेला आराम करता येतो.
६)परीक्षेच्या दोन तास आधी मुलांना तणावमुक्त होण्याची संधी द्यावी. त्यांनी परीक्षेला जाईजाईपर्यंंत वाचत राहावं अशी अपेक्षा चुकीची आहे. अभ्यासाच्या अतिताणामुळे उत्तर लिहिताना त्यांना आठवेनासं होण्याची शक्यता असते.
७)मुलांच्या इच्छेप्रमाणं त्यांना पहाटे किंवा रात्री अभ्यास करू द्यावा. ‘उद्या गणित, विज्ञानाचा पेपर आहे आणि लवकर कसला झोपतोस/झोपतेस’ असं म्हणून त्यांना चहा-कॅाफीसारखं पेयं सारखं पाजून रात्रभर जागण्याची किंवा पहाटे लवकर उठण्याची सक्ती करू नये. रात्री जागायचं की पहाटे उठायचं याचा निर्णय त्यांना घेऊ द्यावा.
९)पालक जर दोघेही नोकरदार असतील आणि दोघांनी किंवा दोघांपैकी एकानं खास मुलांच्या परीक्षेसाठी सुट्टी घेणं हे जर मुलांना दडपण आणणारं वाटत असेल तर तसं करू नये. किंवा आपण घेत असलेली सुट्टी त्याच्या अभ्यासावर लक्ष ठेवण्यासाठी नाही, तर परीक्षेच्या काळात त्याला काय हवं नको ते पाहण्यासाठी म्हणून घेत आहोत हे त्याला समजून सांगावं.
१0)परीक्षेच्या काळात मुलांशी अपेक्षित निकालावर, पुढील कोर्सच्या प्रवेशावर बोलू नये. निकालाचं मुलांवर दडपण येण्याची शक्यता असते.
११)पेपर देऊन आल्यावर मुलांना त्या विषयाच्या पेपरच्या ताणातून मोकळं होऊ द्यावं. काय आलं नाही यावर चर्चा करण्यापेक्षा त्याला काय काय सोडवता आलं यावर बोलावं.
१२)एका पेपरातून मोकळं झाल्यावर त्याला लगेच दुसर्‍या पेपरच्या अभ्यासाला जुंपू नये.

घरात कफ्यरू कशाला, घराचा तुरुंग कशाला?
मनोरंजन हा आयुष्यातला खाण्या-पिण्याच्या गरजेइतका महत्त्वाचा आणि परीक्षेच्या काळातला आवश्यक घटक आहे. परीक्षा आहे म्हणून केबल काढून टाकणं, टीव्ही बंद करणं, मुलांचे खेळ बंद करणं यामुळे मुलांवर परीक्षांचा अनावश्यक ताण पडतो. संध्याकाळचा एक ते दीड तास त्यांनी अभ्यासाशिवाय घालवणं यात काही गैर नाही. उलट या एक ते दीड तासात त्यांनी मैदानी खेळ खेळले तर त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्याचा चांगला परिणाम त्यांच्या अभ्यासावर होतो. मित्र-मैत्रिणींना भेटून त्यांच्याशी बोलून त्यांचा ताण हलका होत असेल तर त्यांना तसंही करू द्यावं. शिवाय नुसतं पडून त्यांना टीव्ही पाहावा असं वाटत असेल तर तोही पाहू देण्याची मुभा पालकांनी विनाकटकट द्यावी. परीक्षेच्या काळात टीव्ही वगैरे बंद ठेवण्याची गरज नाही. फक्त त्यांना टीव्ही नेहमीपेक्षा र्मयादित काळापुरता पाहू द्यावा. घरात अभ्यासाशिवाय दुसरी काही चर्चाच नको, असं वातावरण ठेवू नये. विशेषत: मुलं जेव्हा तुमच्याशी विरंगुळा म्हणून बोलायला येतात तेव्हा त्यांची इच्छा नसेल तर अभ्यासावर बोलू नये. तसेच नाश्त्याच्या वेळेस, जेवणाच्या वेळेस हलक्या-फुलक्या विषयांवर त्यांच्याशी गप्पा मारून वातावरणातील ताण निवळावा. एकूण मुलांच्या परीक्षांच्या काळात घरात कफ्यरू लावण्याची नव्हे, तर त्यांच्याशी हसत-खेळत राहण्याची गरज आहे.
ND
मुलांनी काय खावं, काय टाळावं.?
१)अभ्यासाच्या काळात काही मुलांना खूप भूक लागते, तर काही मुलं काहीच खात नाही. ही दोन्ही त्यांच्यावरील अतिताणाची लक्षणं आहे. त्यापेक्षा अभ्यासाच्या वेळेत त्यांना विशिष्ट अंतरानं खायला द्यावं.
२)दिवसातून दोनच वेळा मुलांना पोटभर जेवायला न देता चार वेळा विभागून थोडं थोडं खायला द्यावं.
३)मधल्या वेळेच्या खाण्यात त्यांना फळं, सुकामेवा खाण्यास द्यावा.
४)परीक्षेला जाण्याआधी त्यांना लिंबू सरबत द्यावं.
५)परीक्षेवरून आल्यावर त्यांना धपाटे, धिरडे असा थोडा चटकदार खाऊ दिला तरी चालेल.
६)प्रथिनं असलेला आहार मुलांना द्यावा.
७)मुलं पहाटे लवकर उठून अभ्यासाला बसत असतील तर पहाटे उठल्यावर त्यांना नुसताच चहा किंवा दूध देऊ नये. त्याबरोबर फळे किंवा सुकामेवा द्यावा. हे दोन्ही नसतील तर पोळी किंवा बिस्किटं पण चालतील. तसेच मुलं रात्री अकरानंतर जर अभ्यास करत असतील तर रात्री नुसताच चहा न देता थोडं खायलाही द्यावं. नुसत्या चहानं मुलांना पित्ताचा त्रास होण्याची शक्यता असते.
८)मुलांना परीक्षेच्या काळात बाहेरचं किंवा जंक फूड, फास्ट फूड देऊ नये. आपल्या हातानं बनवलेलं ताज ताजं मुलांना खायला द्यावं.
९)परीक्षेच्या काळ म्हणजे भर उन्हाळ्याचा काळ असतो. त्यांच्या शरीरात पुरेसं पाणी जाण्याची आवश्यकता असते. तेव्हा थोड्या-थोड्या वेळानं त्यांना पाणी प्यायला द्यावं. मधून-मधून सरबत द्यावं. फळांच ज्यूस देऊ नये त्यापेक्षा लिंबाच्या सरबताला प्राधान्य द्यावं.

नुसतेच पालक नका; मित्र बना
परीक्षेच्या काळात मुलांना तुमच्याकडून शिस्तीची किंवा तुमच्या सहानुभूतीची नव्हे, तर तुमच्या सहकार्याची गरज असते. तुमच्या सूचनांची नव्हे तर तुमच्यासोबतच्या संवादाची गरज असते. प्रत्येक मूल हे स्वतंत्र असतं. त्याच्या क्षमता वेगळ्या असतात, हे आधी पालकांना स्वीकारता आलं पाहिजे. आपल्या मुलांची इतर मुलांशी तुलना करणं, स्वत:चं उदाहरण देणं यामुळे त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होईल. तुमच्यापासून तुमचं मूल दूर होण्याची, तुमचा सहवास त्याला नकोसा वाटण्याची, त्यातून त्याला नकारात्मक ऊर्जा मिळण्याची शक्यता असते. त्याच्यातील दोषांना दूषणं देत बसण्यापेक्षा ते दूर होतील म्हणून प्रेमानं सहकार्य करा. त्याच्यातील गुणांची, क्षमतांची, त्याच्यातील ताकदीची त्याला जाणीव करून द्या.