गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. स्वतःला घडवताना
Written By

वाचनाने बुद्धिमत्ता वाढते

आपल्या समाजात सध्या मुलांच्या करिअरवर पालकांची मोठी नजर असते. त्याला शालेय शिक्षणातून पिळून काढून जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी उद्युक्त करण्यावर पालकांचा भर असतो. पण ते करताना ही पालक मंडळी त्याने अभ्यासाशिवाय अन्य काहीही वाचू नये याबाबत दक्ष असतात. त्याच्या हातात एखादे गोष्टीचे पुस्तक दिसले की ते हिसकावून घेतात आणि असे फालतू वाचन करण्यात वेळ घालवण्यापेक्षा तेवढाच वेळ शाळेचा अभ्यास केला तर चार दोन मार्क जास्त पडतील असा उपदेशही करतात.
 
खरे तर असे फालतू वाचन हे फालतू नसते. जी मुले अवांतर वाचन जास्त करतात त्यांचाच अभ्यास पक्का असतो असा अनुभव आहे. कारण शाळेच्या पुस्तकाबाहेरचे काही काही वाचून त्याच्या मनात काही नवे शब्द आणि संकल्पना रुजतात आणि त्यामुळे त्याला कोणतीही नवी संकल्पना लवकर अवगत होते. ब्रिटनमधील एडिनबरो येथील मानसशास्त्रज्ञ स्टुअर्ट रिची यांनी हे संशोधन केले आहे. 
 
आपल्या मुलाचा अभ्यास पक्का करायचा असेल तर तो शाळेतली पुस्तके वाचतो की नाही हे तर पाहाच पण तो त्याशिवाय अन्य काही वाचत आहे की नाही यावरही लक्ष ठेवा असा सल्ला त्यांनी पालकांना दिला आहे. किंबहुना मुलाची वाचनाची क्षमता आणि त्याला किती लहान वयात वाचायला येत आहे यावर त्याची प्रगती ठरते असे म्हटले आहे. तेव्हा आता मुलाच्या हातात गोष्टीचे पुस्तक दिसले की ते हिसकावून घेऊ नका. त्यामुळेच त्याचा अभ्यास पक्का होणार आहे.