गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. फिलिपाईन्स डायरी
Written By वेबदुनिया|

फिलिपाईन्स डायरी 6

- चारू वाक ( अनुवादित)

PR

















हाय , निवडणुकांच्या धामधुमीने गेल्या काही दिवसात आश्वासने, चर्चा, दावे प्रतिदावे याची मोठी धूम उडाली असेल. इथलेही राज्यकर्ते काही वेगळे नाहीत. एकेकाळचा सुवर्णद्वीप असणारी ही भूमी आजही एक विकसनशील राष्ट्रंच आहे. भ्रष्ट राज्यकर्त्यांना दूर करण्याचे अनेक यशस्वी प्रयत्न करूनही या देशात गरिबी, संपत्तीची विषम वाटणी असे कळीचे मुद्दे आवासून उभे आहेत. कदाचित भारतापेक्षा आकारमान लहान असल्यामुळे असेल पण इथे बऱ्याच गोष्टी अधिक कुशलतेने व्यवस्थापित, नियंत्रित केल्या जातात असे दिसते. या छोट्या देशाकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे.

बसेससाठी वेगळी लेन ठेवणे हे मुंबई पुण्यात आजही स्वप्नंच आहे. मनीला मध्ये अनेक ठिकाणी ही सोय दिसते. रस्तेही तेवढे मोठे आहेत. सर्व टॅक्सी पूर्ण वातानुकूलित असल्यामुळे टॅक्सीत बसणे हा एक सुखद अनुभव असतो. टॅक्सी मीटर इलेक्ट्रॉनिक असल्यामुळे कधी मीटर गरगर फिरण्याची भीती वाटत नाही. मनिलामधले जुने लोक कदाचित इतर अप्रिय अनुभव सांगतीलही पण मला तरी या छोट्या वास्तव्यात तसा अनुभव आला नाही. खासगी कार सोडल्या तर प्रवासी आणि मालवाहतूक करण्याऱ्या सर्व वाहनांवर LTFRB ( Land Transportation And Franchising Regulatory Body) चा फोननंबर लिहिलेला असणे आवश्यक. चालकाच्या वाहन चालवण्याबद्दल काही तक्रार करायची असेल तर त्या क्रमांकावर कॉल करून तक्रार नोंदवता येते. सगळे टॅक्सीचालक इंग्लिश बोलू शकतात ही पण आपल्यासारख्या परकीय प्रवाशांना दिलासा देणारी बाब ठरते.

मनीला बऱ्यापैकी परसलेले आहे. शहरातली मेट्रो रेल्वे सेवा पूर्ण शहरात नसली तरी बराच भाग कव्हर करते. अजून आम्ही वारजे-हडपसर, हिंजवडी-हृदयसर अशा मेट्रोमार्गाची कल्पनाही केलेली नाही. फिलिपाईन्सचे सरकार त्या देशाला एक पर्यटक स्थळ म्हणून चेहरा देण्याचा प्रयत्न करत आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ठिकाणांचा विकास करण्यात येत आहे. पर्यटकांना खरेदी करण्यासाठी स्मृतिचिन्हे ठरवली गेली आहेत. अनेक ठिकाणी ही स्मृतिचिन्हे पर्यटकांना खुणावत असतात, माहिती देत असतात, इथले 'जीपनी' हे वाहन आपल्या सहा आसनी टमटमची आठवण करून देते.

अमेरिकन सैन्य 1950 मध्ये फिलिपाईन्स सोडून मायदेशी परतले. त्यांनी वापरलेल्या अनेक जीप इथेच पडून होत्या. याच इंजिनांवर थोडे प्रयोग करून 12-15 प्रवाशांना नेतील अशा लांबुळक्या जीपनी बनवला गेल्या. एकदम रंगीबेरंगी, सजवलेल्या जीपनी हैद्राबादामधील रिक्शांची आठवण करून देतात. नसिरूद्दिन शहाच्या हिरो हिरालालमध्ये आहे या रंगीन रिक्शाचे चित्रण. इतक्या वर्षात 'जीपनी', पिनॉय लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून गेली आहे. जीपनी हे सुद्धा एक स्मृतीचिन्ह बनले आहे. शंख शिंपले मोत्यापासून बनलेल्या लहानमोठ्या वस्तू, तऱ्हतऱ्हेची फ्रीज मॅग्नेटस, जीपनीची छोटी मॉडेल्स, बोराके किंवा माऊंट मेसॉनचा ज्वालामुखी दाखवणारे टी-शर्टस अशा अनेक वस्तू प्रत्येक पर्यटनस्थळी उपलब्ध असतात आणि त्याबरोबर हसतमुख विक्रेतेही! आपल्याकडे अनेक पर्यटनस्थळे, लेणी, मंदिरे महाला आहेत पण गोवा, केरळ, राजस्थान सोडले तर कुणी मोठ्याप्रमाणावर प्रयत्न करतंय असे दिसत नाही.

मागच्या आठवडा इथे 'होली विक' म्हणून साजरा झाला. पवित्र गुरुवार, गुड फ्रायडे आणि ईस्टर अशा सुट्ट्यांमुळे आख्खा देश मौजमजेच्या वातावरणात होता. आम्हीही एक दिवस सुटी घेतली. बुधवारी जवळपासच्या एखाद्या बीचवर जायचे ठरले. 'बतंगास' या प्रसिद्ध स्थळी भरपूर गर्दी असणार हे नक्की होतं म्हणून आम्ही अनिलाओ इथल्या एका खासगी बीचवर जायचं ठरवलं. ईगल पॉंईंट रिसॉर्टचा स्वत:चा बीच होता. फिलिपाईन्स हे बेटांचे राष्ट्र आहे. या बेटांमध्ये पर्यटकांना खेचतील अशी अनेक ठिकाणे आहेत. अशी बेंट, समुद्रकिनारे खासगी उद्योगांना 5-10 वर्षाच्या भाडेपट्टीवर दिली जातात. हा विकासच मग तिथे स्नॉर्केलिंग, स्कूनर डायव्हिंग, आयलंड हॉपिंग, स्पा अशा सुविधा निर्माण करतो आणि कमावतो. सरकारनेच सर्व काही करावं अशी अपेक्षा कुणी करत नाही. अमाच्या हा बीचपण एक सही जागा होती.

प्रत्येक पर्यटन स्थळी 'स्वच्छ' स्वच्छतागृहे, माहितीकक्ष, खाद्यपेयांचे स्वच्छ स्टॉल्स आहेतच. शिवाय सेवा देणारे लोकही 'काय कटकट आहे' असा भाव अजिबात न आणत हसतमुख चेहऱ्याने, अदबीने सेवा देतात. पिनॉय लोकांची सौदर्यदृष्टी वाखाण्याजोगी आहे. बतंगासचे छोटुकले गाव इतके सुंदर, नीट ठेवले होते की मलाही तिथे स्थायिक होण्याचा मोह झाला. फिलिपिन्सला 'रिटायरमेंट डेस्टिनेशन' म्हणूनही पुढे केलं जातंय. अमेरिकन आणि जगभर पसरलेल्या फिलिपिनो लोकांसाठी हा एक छान पर्याय आहे.

काल मनिलातील इथून दिसणारा सूर्यास्त हँडिकॅमवर शूट करण्यासाठी गेलो होतो. आपल्या मरीन ड्राइव्हची आठवण करून देणारा भाग. अनेक जोडपी, कुटुंबे संध्याकाळची हवा खात बसली होती. काहीजण माशाचा गळ टाकून आपले भाग्य अजमावतं बसले होते. सूर्यास्त झाला आणि सगळा मनीला बे विविधरंगी दिव्यांनी उजळून निघाला. जवळपास दोन किलोमीटर लांबीचा तो समुद्रकिनारा विविध आकारांच्या, रंगाच्या झगमगत्या दिव्यांनी न्हाऊन निघाला. चौपाटीचे सुशोभीकरण कसे करायचे याच्या कल्पना घेण्यासाठी मुंबई मनपाचे नगरसेवक एखादा अभ्यासदौरा ही काढू शकतील.

अख्ख्या मनिलामध्ये मेक्सिकन, थाई, चायनीज, स्पॅनिश, जपानी, कोरियन पद्धतीची रेस्टॉरंट्स ठायी ठायी सापडतील. अरानेटा सेंटर या क्रिया कम शॉपिंग हब मध्येच अनेक मॉल्स, करमणुकीच्या केंद्राबरोबरच तब्बल शंभरापेक्षा जास्त रेस्टॉरंट्स आहेत. हीच गोष्ट अयाला सेंटरची. मॉल ऑफ एशियाची बातंच काही और. आकारमानाने आशियातील तिसऱ्या क्रमांकाच्या या मॉलमध्ये सुमारे 2000 दुकाने आहेत. आईस स्केटिंग रिंग, तारांगण, मॉलचा स्वत:चा परेड करत मनोरंजन करणार बँड अशी अनेक आकर्षणे. शुक्रवार, शनिवारी मॉल तर्फे समुद्रकिनाऱ्यावर नेत्रदीपक आतषबाजी केली जाते म्हणून आणिकच गर्दी.

या मॉलमध्ये स्पा ट्रिटमेंटस देणारा एक विभाग आहे. आपल्याकडे मुंबई आणि इतर शहरातील काही मसाज सेंटर्स मध्ये चालणाऱ्या गैरकृत्यांमुळे या धंद्याचे नाव अगदी बदनाम झाले आहे. नागेश कुकनूरचा 'बॉंबे टू बँकॉक' सारखा चित्रपटही मसाज की वेश्याव्यवसाय असा संशय मनात ठेवून जातो. फिलिपाईन्स मध्ये स्पा किंवा बेलनेस सेंटर्स, गल्ली बोळात सापडतात. अनेक प्रकारचे सौंदर्यवर्धक उपचार तसेच तणावमुक्तीसाठी विविध उपचार या स्पा मधून केले जातात. जपानी शियासू, चिनी ऍक्युप्रेशर, थाई, हवाईअन, बाली आणि स्वीडिश मसाज देणारे अनेक पर्याय. काही सेंटर्स चोवीस तास चालू असतात. तर काही केवळ पायांवर उपचार करण्यात स्पेशल. या सोयींचे दर ही वेग वेगळे. शंभर रुपयांपासून 800-1000 पर्यंत. लोक आपल्या कुटुंबीयासह जातात आणि हलक्या फुलक्या शरीराने परततात . अनेक लोकांसाठी कमाई करण्याचा हा एक प्रतिष्ठित व्यवसाय आहे.

अजून एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे विविध ठिकाणी असलेला तृतीय पंथीयांचा वावर. दुकाने, केशकर्तनालये, मसाज स्पा आणि रेस्टॉरंट्स अशा अनेक ठिकाणी हे हिजडे निवांत नोकरी करत असतात, वावरत असतात. तगालू भाषेत यांता 'बाकला' असे संबोधले जाते. मनीला मस्त्यालयाला भेट दिली तेव्हा तिथे एका कुटुंबासोबत विचित्रपणे वागणारी एक टॉमबाईश मुगली होती. नंतर लक्षात आले की ते एक अधलेमधलेच प्रकरण होते. आई वडील मात्र निवांत होते. असे मूल बरोबर असूनही त्यांच्या वावरण्यात कुठलाही संकोच किंवा अस्वस्थता नव्हती. हिजडा म्हटले की आपल्या डोक्यात टाळ्या वाजवणारा किंवा भसाड्या आवाजात भीक मागणारा अशीच प्रतिमा उभी राहते. इथे मात्र मी त्यांना एक सर्वसाधारण आयुष्य जगताना पाहत होतो. एक सहकाऱ्याने सांगितले की केशकर्तनालयांमध्ये, कपडाच्या दुकानांमध्ये हे लोक हमखास नोकरीला असल्याचे दिसते. कधी पिनॉय चॅनेल वरचे फिलिपिनो चित्रपट पाहताना 'बाकला' पद्धतीची पात्रे या समाजाने स्विकारह्याचे दिसते. माणसे अशी असू शकतात आणि त्यांनाही सामान्य जीवन जगण्याचा हक्क आहे ही बाब फिलिपिनो समाजाने स्वीकारल्याचे दिसून येते.

एका ठिकाणी 'मनीला फिल्म सेंटर'मध्ये असणाऱ्या 'अमेझिंग फिलिपिन्स डान्स शो'ची माहिती कळली. इमेल्डा मार्कोसच्या पुढाकाराने उभारल्या गेलेल्या फिलिपिन्स सांस्कृतिक केंद्राचा एक भाग म्हणजे मनीला फिल्म सेंटर. माझ्या टॅक्सी चालकाच्या मते ती एक झपाटलेली जागा होती. इमारतीचे बांधकाम चालू असताना अपघात होऊन अनेक लोकांचा बळी गेला. सरकारी आकडा 12 तर लोकांच्या अंदाजे तब्बल 169 कामगारांचा मृत्यू झाला. एकदा कुप्रसिद्ध झालेली ही इमारत आजही निर्जन आहे. चौकशीला गेलो तेव्हा कळले की एक कोरियन कंपनी या डांस शो चे आयोजन करते आणि भाग घेणारे सर्वच कलाकार तृतीयपंथी आहेत. उच्च निर्मितीमूल्य असणाऱ्या या कार्यक्रमाचे तिकिट दोन हजार रुपयांच्या आसपास असेल तरी फिलिपिनो लोकांसाठी खास डिस्काउंट होते...... उपेक्षित समाज घटकाचा एका उपेक्षित इमारतीला प्रतिष्ठा मिळवून देण्याचा एक प्रयत्न!

परतताना माझ्या मानतं मनीला एक चांगली मेट्रो आहे का? असा प्रश्न होता.... हे शहर सर्व प्रकारच्या माणसांना सन्मानाने उपजीविका करण्याची संधी देते म्हणून कदाचित ही चांगली मेट्रो आहे असे मला वाटत असावे.

[email protected]