शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. रेल्वे बजेट 09
Written By अभिनय कुलकर्णी|

मुंबईकरांची पुन्हा उपेक्षाच- राम नाईक

देशातील एक कोटी वीस लाख दैनंदिन प्रवाश्यांपैकी निम्म्याहून अधिक म्हणजे ६५ लाख प्रवासी मुंबईकरांचा आपल्या भाषणात साधा उल्लेखही रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी न केल्याने मुंबईकरांची घोर निराशा झाली आहे. मुंबईकरांना सापत्न भावाने वागविण्याचे लालू प्रसाद यांचे धोरणच त्या पुढे चालविणार असे यामुळे वाटल्याने मुंबईकर संतापले आहेत अशी प्रतिक्रिया माजी रेल्वे राज्यमंत्री राम नाईक यांनी दिली आहे.

एमयुटीपी १ व२ साठी किती तरतूद केली आहे याबाबत रेल्वे मंत्र्यांना भाषणात एक शब्दही नाही. एवढेच नव्हे तर हार्बर मार्गावर १२ डब्यांच्या गाडया देण्याचीही घोषणा त्यांनी केली नाही. गेली दोन वर्षे प्रवासी भाडयात कपात झाली. अन्य प्रवाशांप्रमाणेच मुंबई उपनगरी प्रवासी भाडेही कमी करण्याची
मागणी रेल्वे मंत्र्यांनी मान्य केली नाही. याचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. चेन्नई कोलकात्यातील महिला प्रवाशांना विशेष गाडी देणार्‍या या रेल्वे मंत्र्यांनी वारंवार मागणी करुनही मुंबईच्या महिला प्रवाशांना गर्दीच्या वेळी मध्य व पश्चिम रेल्वे वर आणखी एक-एक गाडी दिली नाही याचा स्वाभाविक संताप मुंबईतील महिलांना आहे. असेही श्री. नाईक म्हणाले.

तात्काळ सेवची भाडे आकारणी ही प्रवासी जेवढे अंतर प्रवास करणार आहेत तेवढयासाठीच केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. रेल्वे अर्थसंकल्पाच्या चर्चेच्या वेळी मुंबईकर प्रवाश्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही आंदोलन करु, असा इशाराही दिला.