मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. राखी
Written By
Last Modified: बुधवार, 6 ऑगस्ट 2014 (16:21 IST)

रक्षाबंधनाचा इतिहास व महत्त्व

श्रावण महिन्यातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. पावसाने समुद्राला उधाण आलेले असते त्या प्रीत्यर्थ समुद्राला नारळ अर्पण करतात हा प्रमुख विधी आहे. या दिवशी नारळाचे पदार्थ बनवून त्याचा नैवद्य अर्पण करतात. या सणाचे महत्व विशेष करुन समुद्रकाठच्या भगात जास्त आढळते. नारळी पौर्णिमेनंतर कोळी मंडळी समुद्रात मच्छीमारीस जातात. त्याप्रित्यर्थ समुद्राचे पूजन करतात. 
 
१. इतिहास
अ. 'पाताळातल्या बळीराजाच्या हाताला लक्ष्मीने राखी बांधून त्याला आपला भाऊ केले व नारायणाची मुक्‍तता केली. तो दिवस श्रावण पौर्णिमा होता.' लक्ष्मीने बळीराजाला घातलेल्या बंधनाविषयी संस्कृतमध्ये एक श्लोक आहे.
येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबल: ।
तेन त्वामपि बध्नामि रक्षे मा चल मा चल ।।
अर्थ : महाबली व दानवेन्द्र असा जो बली राजा जिने बद्ध झाला, त्या रक्षेने मी तुलाही बांधतो. हे राखी, तू चलित होऊ नकोस.
आ. भविष्यपुराणात सांगितल्याप्रमाणे रक्षाबंधन हे मूळचे राजांसाठी होते. राखीची एक नवी पद्धत इतिहासकाळापासून सुरू झाली.
 
२. भावनिक महत्त्व : राखी बहिणीने भावाच्या हाताला बांधायची असते आणि त्यामागे भावाचा उत्कर्ष व्हावा व भावाने बहिणीचे रक्षण करावे, ही भूमिका असते. बहिणीने भावाला राखी बांधण्याहून जास्त महत्त्वाचे आहे, एखाद्या तरुणाने / पुरुषाने एखाद्या तरुणीकडून / स्त्रीकडून राखी बांधून घेणे. त्यामुळे त्यांचा, विशेषत: तरुणांचा व पुरुषांचा तरुणीकडे किंवा स्त्रीकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलतो.
 
३. रक्षाबंधनाचे आध्यात्मिक महत्त्व : रक्षाबंधनामुळे बहीण व भाऊ यांना होणारा आध्यात्मिक लाभ म्हणजे त्यांच्यातील देवाणघेवाण हिशोब कमी होणे. या जन्मात व्यक्‍ती एखाद्याची नातेसंबंधी असण्यामागील महत्त्वाचे आध्यात्मिक कारण असते त्यांच्या आधीच्या जन्मांतील कर्मांमुळे एकमेकांना सुख व दु:ख देण्याच्या दृष्टीने त्यांच्यात निर्माण झालेला हिशोब.ज्याला अध्यात्मशास्त्रात `देवाणघेवाण हिशोब', असे म्हटले जाते. या हिशोबापायी त्या त्या नातेसंबंधातून आपल्याला सुख वा दु:ख अनुभवायला मिळत असते. बहीण व भाऊ यांचा एकमेकांत साधारण ३० टक्के इतका देवाण-घेवाण हिशोब असतो. तो राखी पौर्णिमेसारख्या सणांच्या माध्यमातून कमी होतो. हा आध्यात्मिक लाभ अधिकाधिक होण्यासाठी बहिणीने भावाकडून अपेक्षा बाळगू नये व भावाने बहिणीला सात्त्विक ओवाळणी द्यावी. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाकडून वस्तूच्या रूपात कोणतीही अपेक्षा मनात बाळगू नये. तशी अपेक्षा बाळगल्यास ती त्या दिवशी मिळणार्‍या या आध्यात्मिक लाभापासून वंचित रहाते.
 
४. राखी बांधणे : तांदूळ, सोने व पांढर्‍या मोहर्‍या पुरचुंडीत एकत्र बांधल्याने रक्षा अर्थात राखी तयार होते.
 
५. प्रार्थना करणे : बहिणीने भावाच्या कल्याणासाठी व भावाने बहिणीच्या रक्षणासाठी प्रार्थना केली जाते.