गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रीरामनवमी
Written By वेबदुनिया|

कीर्तनातील लोकरामायण

प्रा.डॉ.प्रकाश खांडगे

रामायण आणि महाभारत हे भारतीय संस्कृतीचे दोन नेत्र आहेत. लोककल्याणकारी राज्य म्हणजे 'रामराज्य` आणि युगधर्म आणि कर्मयोगाचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे 'महाभारत`. रामायण आणि महाभारत या महाकाव्यांच्या मुशीत अनेक लोकरामायणे आणि लोकमहाभारतांची निर्मिती झाली. वाल्मीकींचे रामायण आणि व्यासांचे महाभारत यांच्या छायेखाली अनेक लोकसंस्कृती धारांचे मळे फुलले. छत्तीसगढची पंडवानी असेल, उत्तरप्रदेशाची रासलीला असेल, पं. बंगालचे कीर्तनीया असेल अथवा कर्नाटकातले यक्षगान असेल तसेच महाराष्ट्रातील कीर्तन, लळीत, दशावताराच्या लोकपरंपरा असतील. राम आणि कृष्ण यांचा वेध वेगवेगळया लोकपरंपरांनी वेगवेगळया माध्यमांमधून घेतला. त्यावेळी लोककथा, लोकगीते, बोलींच्या रूपाने आपापले कल्पबंध कलावंतांनी सजविले. या परंपरेतील कीर्तन प्रकारांत लोकरामायणाचे दर्शन घडते.

श्रीराम नवमीला अनेक मंदिरांमध्ये श्रीराम जन्माचा उत्सव होतो तो कीर्तनाच्या रूपाने। या कीर्तनातील रामायणाची कथा वाल्मिकींची, तुलसीदासाची, संत एकनाथांची की संत नामदेवांची. रामायण हे सर्वांचे सारखेच फक्त अन्वयार्थ वेगळे. वारकरी कीर्तनात नामदेवांचा श्रीराम जन्माचा अभंग प्रमाण मानतात. तो असा-

उत्तम हा चैत्रमास। ऋतु वसंताचा दिवस
शुक्लपक्ष ही नवमी। उभे सुरवर योगी
माध्यान्हाशी दिनकर। पळभर होय स्थिर
सुशेभित दाही दिशा। आनंद नर नारी शेषा
अयोनी संभव नोहे काही श्रमी,
नामयाचा स्वामी प्रगटला

या अभंगावर निरूपण करताना कीर्तनकार जे रामायण उभे करतात ते तुमच्या-आमच्या जणू जीवनातले असते. सावत्र आई तिचे कुटील कारस्थान या कारस्थानाचा शिकार झालेला मोठा पुत्र. त्याची निष्ठा, त्याच्या पत्नीची निष्ठा, बंधूंचे बंधुप्रेम या सर्वांतून सत्वाचा विजय. लोकरामायणातील कथा ही अशी कौटुंबिक. ती मोठय़ा तन्मयतेने कीर्तनकार सांगतो. कौसल्येला डोहाळे लागतात तेव्हा राजा दशरथ तिला डोहाळे विचारतो ती म्हणते 'घेई धनुष्य मारील रावणा लंका बिभीषणा देईन मी`. राजा दशरथ सुमित्रेला डोहाळे विचारतो. ती म्हणते 'वडिलांची सेवा अहर्निश`. राजा दशरथ कैकयीला डोहाळे विचारतो. ती म्हणजे 'ज्येष्ठाशी धाडावे दुरी दिगंतरा` अशी ही डोहाळयांची कथा गहिवरून कीर्तनकार सांगतात, तेव्हा खर्‍या लोकरामायणाची प्रचिती येते. 'अयोनी संभव प्रगटला हा राघव` अशी आरोळी कीर्तनकार मारतो, तेव्हा श्रीरामाच्या पाळण्यावर फुलांची वृष्टी होती. 'राम राम राम राम सीताराम सीताराम` चा गजर होतो. 'झाले रामराज्य काय उणे आम्हासी। धरणी धरी पीके गाई ओळल्या म्हैशी` असा अभंग सुरू होतो. ही लोकरामायणातील कथा कीर्तनात सादर होते. अशीच कथा संत तुलसीदासांची 'चैती` च्या रूपाने गायिली जाते ती अशी-

अवध में बाजे राम बधाईयाँ
अवध नगारिया
राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न
जन्म लिये चार भईंयॉ
चैत्र राम नवमी जन्म लिये है
त्रिभुवन के सुख दैया
राणी कौसल्या मुदित भई है
अनधन देत लुटईया