testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

कथा एका रामकथेची

ram navami
तुकोबारा म्हणतात,
हा कालचा। सुत दशरथाचा।
अनंत जन्मीचा आत्मराम।।
सहस्र वर्षे लोटली तरी जनमानसावरती रामनामाची मोहिनी जशीच तशी का आहे याचे उत्तर या ओळीत मिळते. सामान्यांनी या रामाला स्वत:शी, स्वत:च्या श्वासाशी, जगण्याशी
जोडून घेतले आहे. म्हणून कथा तीच, नायक तोच असला तरी दर पिढीगणिक त्याचा संदर्भ, अर्थ नित्यनूतन वाटत राहतो. दु:खाशी जवळीक कशी करावी, दुष्टांचे निर्दालन कसे करावे व दुर्मतीपासून दूर कसे राहावे हे रामकथा शिकवते. तिने भारतीय जनमानसात विविध उच्चतम मूल्यांची रुजवणूक केल्याने अनेक वादळे आली व गेली पण भारतीय संस्कृतीची वीण उसवली नाही.
रामकथेची अनेक वैविध्यमय पद्य व गद्यरूपे भारतीयांच्या मनावर राज्य करीत राहिली. अनेक ऋषितुल्य कवींनी आपल्या काव्यातून त्या धनुर्धर योद्धय़ाचे चरित्र वर्णिले. मराठीतही पंतकवींची अनेक रामायणे आहेत. कीर्तन, प्रवचनातून त्यातील पंक्ती गायल्या जातात. पण या सर्व रचना विज्ञानुगाचा आरंभ होण्यापूर्वीच आहेत. अलीकडील काळात रसिकांच्या हृदयाचा ठाव घेणारी एक अजोड रामकथा म्हणजे 56 गीतमौक्तिके असलेले ‘गीत रामायण’. 1955 च्या 1 एप्रिलला रामनवमीदिवशी आकाशवाणीच पुणे स्थानकावरून-
‘स्वये श्रीरामप्रभू ऐकती। कुशलव गाती।।’

हे पहिले स्वरपुष्प उमलले व कालांतराने या 56 पुष्पांचा सुगंध आकाशमार्गे सर्वदूर पसरला. विज्ञान व श्रद्धा यांच समन्वयाने घडलेल्या या संमोहनाचे हे हीरक महोत्सवी वर्ष आहे. गदिमा
आणि सुधीर फडके यांच्या प्रतिभेच्या बहरकाळातला मोहर म्हणजे ‘गीत रामायण’. दोहोंच्याही सर्जनशीलतेच्या चरमसीमेची मोहर या गीतांवर उमटली आहे. श्रीधर फडकेंना मी एकदा विचारले होते की, आपल्या मनात असा काही प्रकल्प आहे का? ते उत्तरले की, ‘गदिमा व बाबूजींनी पुन्हा ठरवले तरी अशा तोडीचे काम होणे अशक्य आहे.’ भारतीयांच्या भावगुंफेत शतकानुशतके विराजमान असलेल्या ‘श्रीराम’ या दैवी व्यक्तिरेखेस गदिमांनी भावपूर्ण शब्दात गुंफले व ‘पंत संत तंत’ वाङ्मयाचे सकळ सार या गीतात मांडले. तरीही ते तुकोबारांसारखे ‘वदवी गोविंद तेचि वदे’ अशा नम्रतेने या अलौकिक ‘अमृतसंचया’चे मातृत्व स्वीकारतात.

पुलंच्या म्हणणनुसार ‘आणिमा, गरिमा या सिद्धींप्रमाणे परकाया प्रवेशासाठी सदैव सिद्ध असलेली गदिमा नावाची एक सिद्धी आहे.’ रामकथेतील नाटय़ात्मकता हेरून ती प्रासादिक, प्रवाही शब्दात काव्बद्ध करताना त्यांच्यातला पटकथाकार सदैव जागा असलेला जाणवतो. पुराणकथा, आख्याने, धार्मिक पोथ्यांनी त्यांचा पिंड घडला होता. मोरोपंतांच्या सीतारामायण, काशीरामायण, गंगारामायटातील शब्दांचे तेज त्यांच्या लेखणीत विलसत होते. त्यांनी रेखाटलेली पुत्र, पती, पिता, प्रभू ही रामाची सर्व रूपे मोहक आहेत. पट्टाभिषिक्त होता होता मातेच्या हट्टामुळे तटस्थपणे वनस्थ झालेला राम गदिमांनी अतिशय हळूवारपणे चितारला आहे. त्याची अर्धागिनी जनकनंदिनी सीता, तिची भावांदोलने, तिचा मोह, विरह टिपता टिपता गदिमा या रामकथेस वैश्विक उंचीवर घेऊन जातात.

जगातील कुणीही रामकथा वाचली तर त्याला ती आपलीशी वाटेल. अर्थात हेच कुठल्याही महाकाव्याचे वैशिष्टय़ असते. गदिमांनी हेच वैशिष्टय़ ओळखून या महाकाव्याला साधे सोपे बनवले व सामान्यांच्या जीवनाशी त्याचे नाते जोडले. हीच ‘गीतरामायणा’ची अद्भुतता! गदिमांची लेखणी शतकांचे अंतर कापते व आपल्या चरित्रनायकाचा वा नायिकेच्या मा चा अचूक वेध घेते. ‘लीनते, चारुते, सीते’ वा ‘मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे’ ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत. दशरथाच्या देहप्रयाणाची वार्ता ऐकल्यानंतर ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हा भरताला केलेला उपदेश केवळ तत्त्वज्ञान राहात नाही. धीरोदात्तपणे दु:ख सहन करूनही दुर्बल न बनता कर्तव्य व कर्तृत्व ह्यांची सांगड घालून रामायण कसे घडवावे, याचा सामान्य जीवांना दिलेला तो राममंत्रच बनतो.

कर्तव्याच्या कठोर हाकेला साद देऊन सत्तेची संगत व नात्यांची निकटता निग्रहाने नाकारून वनवासाची वाटचाल पुढे सुरू ठेवणारा राम एका महाकावचा विषय न बनला तरच नवल! हा महानायक व त्याला शब्दांकित करणारा महाकवी या दोहोंनाही आजच्या श्रीरामनवमीनिमित्ताने प्रणाम! महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदारांनी टिळकांच्या गायकवाड वाडय़ातील समारंभात गदिमांना ‘आधुनिक वाल्मीकी’ ही पदवी बहाल केली. साक्षात स्वातंत्र्यवीर सावरकर गदिमांना म्हणाले, ‘आजच्या पिढीत तुमच्या योग्यतेचा दुसरा कवी नाही.’ विजादशमीच्या निमित्ताने दिल्या
जाणार्‍या सोन्याच्या द्विपत्राप्रमाणे ‘गीतरामायणा’ची गदिमा व बाबूजी ही दोन सुवर्णपाने आहेत. त्या दुसर्‍या सुगंधित, सुरेल पानाबद्दल पुन्हा कधीतरी!

प्रशांत देशपांडे


यावर अधिक वाचा :

गणेश विसर्जनाचे मुहूर्त 2018

national news
गणपती आगमनानंतर लगेच विषय येतो गणपती विजर्सनाचा. या वर्षी अनंत चतुर्दशी 23 सप्टेंबर रोजी ...

शनिवारी चुकून खाऊ नये हे 5 पदार्थ, शनिदेव होतात नाराज

national news
शनि देव न्याय करणारे देव मानले गेले आहे अर्थात चांगले कर्म केल्यास चांगले फल तर वाईट कर्म ...

ओंकारोपासनेचे उपास्य दैवत शिवगणेश ।

national news
अस्ति, भाति, नश्ति आणि पश्यति व क्षेमं! हे सगळे या वस्तुमत्रांचे, जीवमात्रांचे ...

संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे

national news
कौटुंबिक पातळीवर घरोघरी आणि सामाजिक पातळीवर सार्वजनिक ठिकाणी आपण श्री गणेश देवतेची ...

बघा कोणता गणपती करेल आपल्या मनाची इच्छा पूर्ण

national news
1*संतान गणपती- संतान प्राप्तीसाठी विशिष्ट मंत्रासह संतान गणपतीची मूर्ती दारावर लावली. 2* ...

राशिभविष्य