गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रीरामनवमी
Written By वेबदुनिया|

लोकशाहीची रूजवात करणारा राजा राम

श्रीराम जन्मापूर्वीही राजेशाही होती आणि राजा जनतेचे पालन करत होता. रामाने जनतेच्या इच्छेनुसार राज्य व्यवस्था निर्माण केली होती. जेव्हा राम वनवासाला निघाला तेव्हा लक्ष्मणाने त्यांच्याबरोबर जाण्याचा आग्रह धरला होता. त्यावेळी रामाने लक्ष्मणाला राज्याचे महत्त्व समजावून सांगितले आणि अयोध्येतच राहण्यास सांगितले.

भगवान राम त्रेतायुगातील युगपुरूष होते. सतयुगात धर्म चार पायांवर स्थिर असतो, तर त्रेतायुगात मा‍त्र तीन पायांवर असतो. मात्र रामराज्यात असा विलक्षण योग आला की, सतयुगापेक्षाही धर्माला चांगली स्थिती आली. रामाने भरताला राज्य करण्यास समजावून सांगितले. तेव्हा कैकयीला देखील आश्चर्य वाटले होते.

  WD
मंथरा दासीने कैकयीला अनेक वेळा डिवचण्याचा प्रयत्न केला. परंतु़, कैकयीने रामाबद्दल कधीही वाईट म्हटले नाही. रामाबद्दल ती जे काही बोलली ते अविस्मरणीय राहिले. 'राम धर्माचे ज्ञाता, गुणवान, जितेंद्रीय, कृतज्ञ, सत्यवादी आणि पवित्र असण्याबरोबरच महाराजांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. म्हणून युवराज होण्यासाठी रामच योग्य आहे. तो आपल्या भावांचे पित्यासमान पालन करील. तू त्याच्याविषयी इतकी का जळते. माझ्यासाठी भरतापेक्षा राम अधिक महत्त्वाचा आहे. कारण तो कौसल्यापेक्षाही माझी जास्त काळजी करतो.' असे ती म्हणायची.

राजामध्ये असे काही गुण असावेत की, जनतेने त्याला मा‍ता-पिता, बंधु-भावाप्रमाणे मानले पाहिजे. मंथरा आणि कैकयीमुळे रामाला राज्यभिषेकाऐवजी वनवास भोगावा लागला. तरीही रामाने कुणालाही दोषी ठरविले नाही. एवढेच नाही तर त्याने नशीबालाही दोष दिला नाही आणि राम पित्याची सत्ता सोडून गेला. तेव्हा त्याला मार्गावर दिसणार्‍या कोणत्याच गोष्टींचा मोहही‍ झाला नाही.

सत्ता आज आहे तर उद्या नाही. त्यासाठी भ्रष्‍ट्राचार, संधीसाधूपणाचे राजकारण करून खुर्चीला चिकटून राहणे योग्य नाही. सत्ता येते आणि जातेही. परंतु, लोकशाहीत बुद्धिमान लोक सत्तेसाठी भांडणे करत नाहीत. ते पुन्हा जनतेकडे जाऊन त्यांना सदसदविवेकबुद्धीने मतदान करण्यास सांगतात. अशा प्रकारची लोकशाही असणे आवश्यक आहे.

  WD
युवराज रामाचा राज्याभिषेक होणार होता. त्यामुळे अयोध्या नगरीतील सर्व जनता आनंदोत्सव साजरा करत होती आणि सकाळ होण्याची आतुरतेने वाट पाहत होती. परंतु, सकाळी राम, जानकी आणि लक्ष्मण वनवासाला जाणार असल्याचे धक्कादायक वृत्त त्यांना समजले. अचानक मिळालेल्या या वृत्तामुळे अयोध्यावासियांनी राजमहालाच्या दिशेने धाव घेतली. राजमहालासमोर लोकांची एकच गर्दी निर्माण झाली. तेव्हा सामान्य जनतादेखील रामाबरोबर वनवासाला जाण्यासाठी तयार झाली. कारण, 'राम जेथे राहील तेथे जनता राहील, रामाशिवाय अयोध्येत आमचे काय आहे? असा प्रश्न उपस्थित करून जनतेने आपल्या राजाबद्दलचे प्रेम व्यक्त केले.

अशाच प्रकारे जेव्हा प्रभू रामचंद्र रावणावर विजयी होऊन अयोध्येला परतले. तेव्हा, विरहाने व्याकूळ झालेली प्रजा आपल्या राजाला भेटण्यासाठी धावून आली. सर्वांना आनंद झाला होता. रामही जनतेची ही अवस्था पाहून भारावला. आल्यानंतर त्याने सर्वांचे दोष, दु:ख आणि दारिद्रय दूर केले. आदर्श लोकशाही राज्यात जनतेचा प्रतिनिधी स्वत:चे घर भरत नाही. तर जनतेचे दु:ख आणि दारिद्रयाला त्यांच्या घरातून दूर करण्याचा प्रयत्न करत असतो.

अशा परिस्थितीत नेत्याला मत मागण्याचा, मतदारांना लालूच दाखविण्याची आणि प्रचारात पैसे खर्च करण्याची आवश्यकता पडत नाही.