शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

ताडोबाची ‘माया’ आता टपाल तिकिटावर

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील ‘माया’ वाघिणीचं चित्र आता टपाल तिकिटावर झळकणार आहे. ‘माया’ सध्या ताडोबात येणार्‍या पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय ठरली आहे. याच मायाचे एक मायेने भरलेले छायाचित्र चंद्रपुरातील हौशी छायाचित्रकार अमोल बैस यांनी टिपले आणि हेच चित्र आता टपाल तिकिटाचे रूप घेणार आहे. या तिकिटाच्या निमित्ताने व्याघ्र संरक्षणासंदर्भातील जनजागृतीला नवा आयाम मिळणार आहे.
 
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प जगभरातील पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचं केंद्र राहिले आहे. पट्टेदार वाघांची भूमी म्हणून ताडोबा ओळखले जाते. पट्टेदार वाघाचं हमखास दर्शन येथे होत असल्याने पर्यटकांसोबतच हौशी छायाचित्रकारही मोठय़ा संख्येने येथे हजेरी लावतात.
 
चंद्रपूरचे हौशी छायाचित्रकार अमोल बैस यांनाही ङ्खोटोग्राङ्खीची भारी आवड. त्यांनी एक जानेवारी 2016 रोजी ताडोबातील पांढरपौनी तलावाजवळ माया वाघिणीचं तिच्या बछडय़ासह छायाचित्र काढले. त्यानंतर अमोलनं हे छायाचित्र फेसबुकवर टाकले आणि पाहाता पाहाता त्याला अडीच लाखांपेक्षा जास्त लाईक्स, 25 हजारांवर शेअर्स आणि 14 हजार प्रतिक्रिया मिळाल्या. त्यानंतर हे छायाचित्र इंग्लंडच्या ‘डेली मिरर’ वृत्तपत्रानं मुख्य पानावर प्रकाशित केलं. व्याघ्र दिनी ‘माया’ टपाल तिकिटावर झळकणार. आजवर अनेक छायाचित्रकारांनी ताडोबातील वाघांची छायाचित्रे टिपली आहेत. पण अमोल बैस यांनी जी माया टिपली, ती इतरांना टिपता आलेली नाही. 
 
वाघासारख्या हिंस्त्र पशुचे वात्सल्याने ओतप्रोत हे चित्र त्यामुळे फेसबुकवर तुफान लोकप्रिय ठरले. या फोटोच्या लोकप्रियतेची माहिती मिळाल्यावर चंद्रपूरचेच असलेले वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हे छायाचित्र टपाल तिकिटावर यावे, यासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू केला. त्यांनी अनेक देशी-विदेशी पाहुण्यांनाही हेच छायाचित्र भेट म्हणून दिले आहे. या माध्यमातून वन्यजीव आणि जंगल या दोन्ही घटकांची माहिती जनतेपर्यंत जावी आणि संवर्धनासाठी मदत व्हावी, यासाठी टपाल तिकिटावर 29जुलै म्हणजेच व्याघ्र दिनी तिचा फोटो पोस्टाच्या तिकिटावर छळकणार आहे.