शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: ताडोबा , गुरूवार, 26 मे 2016 (11:18 IST)

ताडोबात प्रथमच विक्रमी व्याघ्रदर्शन

अंधारी व्याघ्र प्रकल्पात बुध्दपौर्णिमेला झालेल्या पाणवठय़ावरील व्याघ्र गणनेत विक्रमी ९० वाघांचे दर्शन झाल्याने प्रगणकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे गेल्या कित्येक वर्षांत इतक्या मोठय़ा प्रमाणात वाघ दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, व्याघ्र गणनेनुसार ताडोबात एकूण ८८ वाघ असून ९० वाघांचे दर्शन झाले असेल तर वाघांची संख्या दोनने वाढली आहे.
 
मोहुर्ली, ताडोबा व कोळसा अशा तीन वनपरिक्षेत्रातील २०७ मचाणींवर ४५८ प्रगणकांना बसविण्यात आले होते. यामध्ये ताडोबाच्या बफर क्षेत्रात १३९ व कोर क्षेत्रात ६८ मचाणींचा समावेश होता. यामध्ये चोवीस तासात कोर झोनमधील प्रगणकांनी ५० तर बफर झोनमध्ये ४० अशा एकूण ९० पट्टेदार वाघांची नोंद घेण्यात आली. यामध्ये वाघांच्या छाव्यांचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे गेल्या कित्येक वर्षांपासून बुध्दपौर्णिमेला ही गणना होत असली तरी इतक्या मोठय़ा प्रमाणात व्याघ्र दर्शन कधीच झाले नाही. यावर्षी प्रगणकांनी नोंद घेतलेला ९० हा आकडा विक्रमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात नुकत्याच झालेल्या चवथ्या टप्प्यातील गणना कार्यक्रमात ८८ वाघ दिसून आले होते. त्यामुळे ही आकडेवारी खरी मानली तर ताडोबातील वाघांची संख्या यावर्षी दोनने वाढलेली आहे. वाघांची ही आकडेवारी बघितली तर प्रगणनेत सहभागी झालेल्या प्रत्येक प्रगणकाने व्याघ्र दर्शन घेतले आहे. वाघांची संख्या वाढण्यास पाणवठे, सूक्ष्म नियोजन व संरक्षण मोठय़ा प्रमाणात कारणीभूत असल्याचे प्रगणकांचे म्हणणे आहे. केवळ वाघच नाही तर बिबटय़ांचीही कोअर व बफर झोनमध्ये मोठय़ा प्रमाणात नोंद घेण्यात आलेली आहे. बफर झोनचे उपवनसंरक्षक गजेंद्र नरवने यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ बिबटय़ांची नोंद घेण्यात आलेली आहे. कोअरमध्ये यापेक्षा अधिक बिबट दिसून आले. वाघ व बिबटय़ांची ही आकडेवारी बघितली तर ताडोबा प्रकल्पात वाघांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे.
 
६५ पक्ष्यांची शिकार
चिमूर तालुक्यातील डोंगरगाव तलाव जवळील एका नाल्यात सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास जंगल भ्रमंतीवर असलेल्या वन्यजीव प्रेमींना शेतालगत असलेल्या नाल्यात विविध जातीचे ६५ पक्षी एका पिशवीत मृतावस्थेत मिळाले. विशेष म्हणजे या नाल्यातील पाणवठय़ाजवळ जाळे दिसून आल्याने येथे पक्ष्यांच्या शिकारीचा भाग असल्याचे दिसून येत आहे. शंकरपूर येथील वन्यजीव प्रेमी युवराज मुरस्कर, सर्पमित्र जगदीश पेंदाम, अमित शिवरकर आदी जंगलात भ्रमण करीत असतांना एका शेतालगतच्या नाल्यात वाघाचे पगमार्ग दिसून आले. या पगमार्कचा पाठलाग करतांना हा प्रकार उघडकीस आला. मृत पक्ष्यांमध्ये ५६ मैना, ३ बुलबुल, ३ रान कबुतर, २ तीर चिमणी व १ दयाळ आदी पक्षांचा समावेश आहे. याप्रकरणी वन विभागाकडे तक्रार करण्यात आलेली आहे. या भागात पानवठे व नाल्यावर जाळे लावून पक्षांची शिकार करणारी टोळीच सक्रिय असल्याचे यातून दिसून येते.