गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , सोमवार, 10 ऑगस्ट 2015 (11:52 IST)

89 वे मराठी साहित्य संमेलन पिंपरी-चिंचवडला

आगामी 89 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पिंपरी-चिंचवड मधील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ संस्थेला देण्याचा निर्णय रविवारी मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. या निर्णयामुळे महामंडळाच्या तीन वर्षाच्या कार्यकाळात एकाच जिल्ह्यात दोनवेळा संमेलने भरवण्याचा मान मिळाला आहे.
 
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक झाली. या बैठकीतील निर्णयाची माहिती महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी पत्रकारांना सांगितली. त्या म्हणाल्या संमेलनासाठी एकूण 12 निमंत्रणे आली. त्यामध्ये महामंडळाच्या स्थळ समितीच्या सदस्यांनी उस्मानाबाद, श्रीगोंदा, डोंबिवली आणि पिंपरी-चिंचवड या स्थळांना भेटी दिल्या आणि त्यानंतरच वरील निर्णय घेण्यात आला. आर्थिक सक्षमता, मध्यवर्ती ठिकाण आणि मनुष्यबळ उपलब्धता लक्षात घेऊनच आगामी संमेलन पिंपरी-चिंचवडला घेण्याचा निर्णय झाला. हा निर्णय घेण्यापूर्वी सविस्तर चर्चाही करण्यात आली.
 
संमेलन आयोजनासाठी बारामतीचा विचार झाला का? असे विचारता त्या म्हणाल्या, मध्यंतरीच्या काळात बारामतीमध्ये युवा संमेलन घेण्यात आले होते. त्यामुळे त्या स्थळाचा पुन्हा विचार झाला नाही.
 
महामंडळाचे कार्यालय पुण्यात असण्याचे हे शेवटचे वर्ष आहे. पुढील वर्षी महामंडळाचे कार्यालय हे मराठवाडय़ात जाणार आहे. त्यामुळे महामंडळाने पुणे जिल्ह्याला झुकते माप दिल्याची चर्चा साहित्यिक वतरुळात होते आहे. महामंडळाच्या बैठकीत अंदमान विश्व साहित्य संमेलना संदर्भात चर्चा झाली. मात्र त्याचा तपशील देण्यास महामंडळाच्या पदाधिकार्‍यांनी असमर्थता दर्शविली.