भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या पाच दिवसांचे महत्व अधिक आहे. शिवाय, हा उत्सव फटाक्यांच्या आतषबाजींशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. त्यामुळेच तर, या सणाचा आनंद साजरा करण्यासाठी ठिकठिकाणी फटाके वाजवले जातात. मात्र, या उत्सवामध्ये आपण नकळत पर्यावरणाला हानी पोहोचवत आहोत, याचे भान राहत नाही. कारण, ध्वनी आणि वायू प्रदूषणाला आमंत्रण देणाऱ्या या फटाक्यांचा कचरा दिवसागणिक वाढत चालला आहे. मात्र, या कचऱ्याकडे सहजपणे कानाडोळा केला जातो. परिसर अस्वच्छ करणारा हा कचरा त्वरित उचलणे गरजेचं असून, याच संदेशपर बांद्रा येथील निवासी वसाहतीमध्ये 'नशिबवान' या आगामी चित्रपटाच्या टीमने स्वच्छता मोहिम राबवली. लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल प्रस्तुत आणि अमोल वसंत गोळे दिग्दर्शित या सिनेमात प्रमुख भूमिकेत असलेल्या भाऊ कदमचादेखील या मोहिमेत मोलाचा हातभार लाभला. दिवाळीच्या उत्तरार्धात म्हणजेच भाऊबिजेच्या मुहूर्तावर राबविण्यात आलेल्या या मोहिमेसाठी स्थानिकांचादेखील उत्तम प्रतिसाद लाभला.
उदय प्रकाश लिखित 'दिल्ली की दीवार' या कथेवर आधारित असलेल्या 'नशीबवान' या सिनेमात भाऊ कदम एका स्वच्छता कामगाराच्या भूमिकेत झळकणार असून ११ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे शिवाय, त्याच्यासोबत मिताली जगताप वराडकर आणि नेहा जोशी देखिल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 'नशीबवान' या सिनेमाचे अमित नरेश पाटील,विनोद मनोहर गायकवाड आणि महेंद्र गंगाधर पाटील हे निर्माते असून, प्रशांत विजय मयेकर आणि अभिषेक अशोक रेणुसे यांनी या सिनेमाच्या सहनिर्मात्याची भूमिका बजावली आहे.