शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 26 जून 2021 (07:59 IST)

अनिल देशमुखांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांना ईडीकडून अटकेची शक्यता, सचिन वाझेचीही तळोजा कारागृहात चौकशी

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे दोन्ही स्वीय सहाय्यक संजीव पालांडे कुंदन शिंदे यांना ईडीकडून अटक होण्याची शक्यता आहे. देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील निवासस्थानी सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने छापेमारी सुरु केली होती. तब्बल ८ ते ९ तास ही चौकशी सुरु होती. यात नागपुरातील निवासस्थानी देशमुखांच्या कुटुंबियांचीही चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळतेय. त्यानंतर संध्याकाळ ईडीचे अधिकारी काही कागदपत्रांसह बाहेर पडले. दुसरीकडे देशमुख यांच्या दोन्ही खासगी स्वीय सहाय्यकांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. चौकशीनंतर आता त्यांच्या अटकेची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
देशमुख यांचे खासगी स्वीय सहाय्यक संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. ईडीच्या कार्यालयात घेऊन जात या दोघांचीही चौकशी केली जात आहे. त्यानंतर आता त्यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाझेचीही तळोजा कारागृहाच चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने जोरदार मोहिम हाती घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
 
एकीकडे ईडीकडून अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील निवासस्थानी सकाळपासून छापेमारी सुरु आहे. तर दुसरीकडे ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील काही बार मालकांचेही जबाब नोंदवल्याचं कळतंय. सुमारे १० ते १२ बार मालकांचा जबाब ईडीने नोंदवला आहे. त्यात या बार मालकांनी मिळून काही महिने ४ कोटी रुपये हप्ता दिल्याची कबुली दिली आहे. त्याच अनुषंगाने आता ईडीची कारवाई सुरु असल्याचं कळंतय.