शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

आता एअरपोर्टच्या धर्तीवर 13 ठिकाणी अत्याधुनिक बस पोर्ट

राज्यात एसटी बस स्थानकांच्या जागी एअरपोर्टच्या धर्तीवर अत्याधुनिक सोयीसुविधा असलेल्या ‘बस पोर्ट’ची उभारणी करण्यात येणार असून, एकूण 13 बस पोर्ट तयार करण्यात येणार आहेत. त्यातील 9 बस पोर्टचा आराखडा तयार झाला आहे, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी येथे दिली. बस पोर्टच्या आराखड्याचे सादरीकरण रावते यांच्या दालनात झाले. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. 
 
रावते म्हणाले की, राज्यातील बसस्थानकांचा कायापालट करण्याचे काम राज्य शासनाने ठरविले आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातील प्रवासी मोठ्या प्रमाणात एसटी सेवेचा लाभ घेतात. मात्र, बसस्थानकांची अवस्था चांगली नसल्यामुळे गैरसोय होत आहे. ही सर्व स्थिती बदलण्यासाठी राज्य शासनाने विमानतळाच्या धर्तीवर अत्याधुनिक सोयी-सुविधा, व्यापारी संकुल, रेल्वे स्थानकाजवळील बस पोर्टशी जोडण्यासाठी स्काय वॉक, शॉपिंग सेंटर आदींचा समावेश असणारे बस पोर्ट उभारण्याचे ठरविले आहे. सध्याच्या एसटी स्थानकाच्या जागेचा पुरेपूर वापर करून बस पोर्ट व व्यापारी संकुलाचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यामध्ये बस पोर्टला महत्त्वाचे स्थान देण्यात येणार आहे.
 
राज्यातील एकूण 13 स्थानकांची बस पोर्टसाठी निवड करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात बोरिवली- नॅन्सी कॉलनी, पनेवल, शिवाजीनगर (पुणे), पुणे नाका बसस्थानक (सोलापूर), नाशिकचे महामार्ग बस स्थानक, औरंगाबादचे मध्यवर्ती बस स्थानक, नांदेडचे मध्यवर्ती बसस्थानक, अकोला मध्यवर्ती बसस्थानक व नागपूरचे मोरभवन बसस्थानक यांचा समावेश आहे. या सर्व बसस्थानकांची रचना एकसारखीच असणार आहे. खासगी-सार्वजनिक भागीदारीतून त्याची उभारणी करण्यात येणार असून त्याची देखभाल व दुरुस्तीही बसस्थानक उभारणारी संस्थाच करणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
 
या बस पोर्टच्या कामासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा मागविण्यात येणार असून बस पोर्टच्या प्रकल्प व्यवस्थापन व सल्लागार म्हणून प्रसिद्ध वास्तू विशारद शशी प्रभू यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी या बस पोर्टचा आराखडा तयार केला आहे. उर्वरित सांगली, धुळे, जळगाव व कोल्हापूर या चार बसपोर्टचे काम दुसऱ्या टप्प्यात सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. याशिवाय राज्यातील इतर बसस्थानकेही विकसित करण्यात येणार असून त्यासाठी 40 वास्तुविशारदांची नेमणूक करण्यात आली आहेत. स्थानिक गरजा लक्षात घेऊन या बस स्थानकांचा आराखडा तयार करणार आहेत. यामध्ये मिनि थिएटरचा समावेश करण्यात येणार आहे. यासंबंधीचा रत्नागिरी बस स्थानकाचा एक आराखडा तयार असल्याचेही रावते यांनी  सांगितले. 
कसे असेल बस पोर्ट
- भविष्यात लागणाऱ्या सुविधांचा वेध घेऊन सर्व तेरा ठिकाणी एकसारखाच आराखडा
- व्यापारी संकुलाचा वेगळा आराखडा
- बस पोर्टमधील सोयीसुविधांचे व्यवस्थापन बांधकाम करणाऱ्या कंपनीकडेच
- प्रत्येक बस पोर्टमध्ये सोलर पॅनेल व पर्जन्य जल पुनर्भरणाची सोय
- बस येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग; तर प्रवाशांसाठी स्वतंत्र व्यवस्था
- प्रवाशांसाठी प्रतिक्षा कक्ष, त्यात बसची माहिती देणारे अत्याधुनिक फलक, रेस्टॉरंटचा समावेश
- पनवेलसारख्या ठिकाणी बस पोर्ट व रेल्वे स्थानक एकमेकांना स्काय वॉकशी जोडणार
- स्काय वॉकवरच शॉपिंग सेंटर असणार व त्याची मालकी एसटी महामंडळाकडे