गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

पंढरपुरात ड्रेनेज फुटून चंद्रभागेचं पाणी दुषित

पंढरपूर- विठूरायाच्या दारी भक्तांना घाणीच्या साम्राज्याला सामोरं जावं लागत आहे. पंढरपुरातील विठ्ठल
मंदिरासमोरील महाद्वार घाटाजवळ ड्रेनेज लाईन फुटल्यानं दूषित पाणी चंद्रभागेत मिसळत आहे. 
 
आषाढी एकादशीला जेव्हा वारकरी चंद्रभागेत स्नान करायला जातील, तेव्हा दूषित आणि अस्वच्छ ड्रेनेजच्या पाण्यात स्नान करण्याची वेळ वारकऱ्यांवर येणार आहे.
 
घाण पाणी साठल्यानं सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. एका बाजुला प्रशासन भाविकांच्या सोयीसाठी कोट्यवधीचा निधी देत असताना प्रशासनाच्या गलथानपणामुळे देवाच्या दारातच भाविकांना गैरसोयींना सामोरं जावं लागत आहे.
 
पंतप्रधान आणि मुख्यमंत्री निवास स्थानासह अनेक वास्तु स्वच्छ ठेवणाऱ्या भारत विकास ग्रुपनं विठ्ठल मंदिराला चकाचक बनविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी नवनवीन अद्ययावत यंत्रांचे प्रशिक्षण मंदिर कर्मचाऱ्यांना देण्यास सुरुवात केली आहे.
 
आषाढी वारी स्वच्छ बनवण्यासाठी प्रशासन सज्ज झाल्याचे सोलापूर जिल्हा परिषदेचे कार्यकारी आधिकारी राजेंद्र भारुड यांनी सांगितलं असलं तरी मंदिरासमोरील महाद्वार घाटाजवळ ड्रेनेज फुटल्याने सर्व घाण पाणी घाटावरुन वाळवंटातून चंद्रभागेत मिसळत आहे. शिवाय वाळवंटात हे घाण पाणी साठून डबकी तयार झाल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे कोट्यवधी खर्च करुनही भाविकांना याचा त्रास होणार आहे.