शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 मार्च 2017 (23:16 IST)

महावितरणच्या वर्ग 3 आणि 4 च्या पदांना 1 एप्रिल पासून मुदतपूर्व सेवानिवृत्ती

महावितरणच्या वर्ग 3 आणि 4 च्या लाईन फोरमन, मुख्य तंत्रज्ञ, प्रधान तंत्रज्ञ वरिष्ठ तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ इत्यादी पदांना दि. 1 एप्रिल 2017 पासून मुदतपूर्व सेवानिवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या वयाची 45 वर्षे पूर्ण होणे बंधनकारक आहे. ही योजना राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
 
जे तारमार्ग कर्मचारी आपली दैनंदिन कर्तव्ये आजारपण, अपघात इत्यादी कारणांनी पार पाडू शकत नाहीत अशा वर्ग-3 आणि 4 च्या संवर्गासाठी मुदतपूर्व सेवानिवृत्ती योजना लागू आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी वर्ग-3 मध्ये मोडत असलेल्या कर्मचार्‍यांची वयोमर्यादा 45 वर्षे पूर्ण आणि 53 वर्षांपर्यन्त असणे आणि वर्ग-4 साठी 45 वर्षे पूर्ण आणि 55 वर्षांपर्यन्त असणे गरजेचे आहे. या योजनेत पात्र होण्यासाठी 'दैनंदिन कामे सुरळीत पार पाडू शकत नाही' अशा आशयाचे सिव्हील सर्जनचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे बंधनकारक आहे. जे कर्मचारी मुदतपूर्व सेवानिवृत्ती त्यांच्या पाल्यासाठी 'विद्युत सहाय्यक' पदावरील नोकरी हा विकल्प शाबूत ठेऊन घेत आहेत, त्यांनी त्यांच्या पाल्याची शैक्षणिक माहिती देणेही गरजेचे आहे. यासाठी पाल्य 10 वी, 12 वी उत्तीर्ण असणे अथवा 10 वी, 12 वी नंतर ईलेक्ट्रीकल/वायरमनचा आयटीआय हा कोर्स महाराष्ट्र राज्य व्यावसायीक परीक्षा मंडळांतर्गत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जे कर्मचारी आपल्या 'पाल्यांना नोकरीचा विकल्प न ठेवता या योजनेचा लाभ घेऊ इच्छितात, त्यांना या योजनेनुसार सेवा झालेल्या प्रत्येक वर्षासाठी 35 दिवसाचा पगार आणि विहित सेवानिवृत्ती पूर्वी राहिलेल्या प्रत्येक वर्षांसाठी 25 दिवसांचा पगार अशा सूत्रानुसार एकूण लाभ मिळणार आहे. हा लाभ एकूण जास्तीत जास्त 15 लाख रुपयांपर्यन्तच मिळणार आहे.
 
कर्मचाऱ्यांनी पाल्यांना 'विद्युत सहाय्यक ' पदावरील नोकरीचा विकल्प शाबूत ठेवून या योजनेचा लाभ घेतल्यास, ज्यांचे पाल्य 10 वी व 12 उत्तीर्ण आहेत त्यांना तीन वर्षांत ईलेक्ट्रिकल/ वायरमनचा आयटीआय कोर्स उत्तीर्ण अथवा समतुल्य शैक्षणिक अर्हता धारण करावयाची आहे. या कालावधीत त्यांनी कंपनीचे काम करावयाचे नसून फक्त त्यांनी त्यांची कार्यालयीन कामकाजाच्या दिवसाची हजेरी संबंधित विभाग/उपविभागीय कार्यालयात द्यायची आहे. 
 
अशा उमेदवारांना सुरुवातीला तीन वर्षाच्या कंत्राटाच्या कालावधीसाठी रु. 7,500/- असे प्रतिमहा एकत्रित वेतन मिळणार आहे. शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर त्यांना 'विद्युत सहाय्यक' या पदावर नेमण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना तीन वर्षाच्या कालावधीकरिता पहिल्यावर्षी प्रतिमहा रु.7,500/-दुसर्‍या वर्षासाठी रु. 8,500/- आणि तिसर्‍या वर्षासाठी रु. 9,500/- असे एकत्रित वेतन मिळणार आहे. त्यांना जागेच्या उपलब्धतेनुसार 'तंत्रज्ञ' या पदावर नोकरीत सामावून घेण्यात येणार आहे. परंतु या पाल्यांनी त्यांची शैक्षणिक अर्हता व त्यांचा 'विद्युत सहाय्यक' पदावरील कंत्राटी सेवा, महावितरणच्या नियम व अटीस आधीन राहून पूर्ण करावयाची आहे.जे पाल्य तीन वर्षांच्या कालावधीत ईलेक्ट्रिकल/वायरमनचा आयटीआय कोर्स महाराष्ट्र राज्य व्यावसायीक परीक्षा मंडळांतर्गत उत्तीर्ण करू शकले नाहीत तर त्यांना दिलेले एकत्रित वेतन या योजनेनुसार मिळणार्‍या एकूण रक्कमेतून वजा करून उर्वरित रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांस अदा करण्यात येणार आहे. या रक्कमेवर व्याज देण्यात येणार नाही. अथवा सदर कर्मचाऱ्यास पुन्हा नोकरीवर सामावून घेण्यात येणार नाही. जे पाल्य 10 वी, 12 वी अधिक ईलेक्ट्रिकल/ वायरमनचा आयटीआय कोर्स महाराष्ट्र राज्य व्यावसायीक परीक्षा मंडळांतर्गत उत्तीर्ण केलेली आहेत त्यांना 'विद्युत सहाय्यक' या पदावरील कंत्राटाच्या कालावधीत पहिल्यावर्षी प्रतिमहा रु. 7,500/- दुसऱ्या वर्षासाठी रु. 8,500/- आणि तिसऱ्या वर्षासाठी रु. 9,500/- एकत्रित वेतन मिळणार आहे. अशा उमेदवारांना जागेच्या उपलब्धतेनुसार 'तंत्रज्ञ' या पदावर सामावून घेण्यात येणार आहे. कर्मचाऱ्याच्या पाल्याच्या नोकरीसाठी या योजनेत वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे (मागास उमेदवारासाठी 5 वर्षे शिथील) अशी असून या योजनेचा लाभ दि. 1 एप्रिल 2017 पासून दि. 30 सप्टेंबर 2017 पर्यत घेता येणार आहे.