शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 मार्च 2017 (15:09 IST)

कर्जमाफीच्या घोषणेशिवाय पर्याय नाही –जयंतपाटील

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधक आक्रमक
 
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून विरोधक आक्रमक भूमिका घेत आहेत. शुक्रवारी विधिमंडळाचे कामकाज सुरू होण्याआधीच विधान भवनाच्या आवारात विरोधकांनी ठिय्या आंदोलन केले तसेच विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यावरही विरोधकांनी सभागृहात प्रचंड घोषणाबाजी करत कर्जमाफीची मागणी केली. विरोधकांच्या आंदोलनामुळे विधानसभेचे कामकाज आधी दोन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
 
शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केल्याशिवाय सभागृह चालू देणार नाही तसेच कर्जमाफीशिवाय या सरकारला पर्याय नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटनेते जयंत पाटील यांनी दिली. हे सरकार आल्यापासून राज्यात आतापर्यंत ८ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी आत्महत्या करतोय ही गोष्ट अत्यंत अशोभनीय आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात म्हणून आम्ही गेल्या तीन दिवसांपासून कर्जमाफीची मागणी करत आहोत असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री आणि सरकारी पक्षातील काही मंत्री आम्ही कर्जमाफीसाठी अनुकूल आहोत असे म्हणतात मग कर्जमाफी का गेली जात नाही ? हे सरकार आणखी किती शेतकऱ्यांच्या आत्महत्येची वाट पाहणार आहे ? असा संतप्त सवाल पाटील यांनी उपस्थित केला. पुढे बोलताना ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर कर्जमाफीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर सभागृहात तशी घोषणा करावी, अन्यथा आम्ही सभागृह चालू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.