गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017 (11:13 IST)

मुंबई महापालिका, मराठी माणूस आणि मोदी!

बृहन्मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला आता पाचच दिवस राहिले आहेत. आज मी तीनच मुद्द्ये घेणार आहे. कोणता एकचएक मुद्दा समोर ठेवून मतदान करावे, मुंबईचे मराठीपण टिकविल्याच्या शिवसेनेच्या दाव्यात किती तथ्य आहे आणि मी स्वतः: किती तटस्थ आहे असे हे तीन मुद्दे आहेत. नरेंद्र मोदी हा एकचएक घटक विचारात घेऊन मतदान करावे असे मला वाटते. सर्व हिंदुत्वविरोधी  राजकीय पक्ष आणि संघटना मोदींच्या विरोधात एकवटल्या आहेत. काय वाटेल ते करून त्यांना मोदींच्या मार्गात काटे पेरायचे आहेत, त्यांना निष्प्रभ करायचे आहे, लोकमानसात त्यांची प्रतिमा काळीकुट्ट करायची आहे आणि पुढच्या निवडणुकीत त्यांचे सरकार स्थापन होणार नाही अशी व्यवस्था करायची आहे. दुर्दैवाने आपली शिवसेना त्यांना सामील झाली आहे. हे लोक मोदींच्या विरोधात का आहेत? कारण स्वातंत्र्य आंदोलनात आणि गेल्या सत्तर वर्षात काँग्रेस संस्कृतीने ह्या देशाची बांधणी ज्या अनैसर्गिक आणि विकृत तत्वांवर केली ती गाडून ह्या देशाला त्याचे मूळ स्वरूप प्राप्त करून देण्याचा विडा मोदी ह्यांनी उचलला आहे. ह्या देशातील अल्पसंख्यांकांना आणि अन्य असंतुष्ट घटकांना त्यांच्या फाजील राजकीय महत्वाकांक्षा फुलविण्याचा, त्यासाठी टोकाला जाऊन अतिशय उग्र आंदोलन करण्याचा आणि परिणामी भारतातून फुटून स्वतंत्र सार्वभौम आणि भारतद्वेषी राष्ट्र स्थापन करण्याचा म्हणजेच स्वयंनिर्णयाचा अधिकार हा काँग्रेस संस्कृतीने ह्या देशात प्रतिष्ठित करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. काँग्रेस संस्कृतीने पाकिस्तान तसेच काश्मीर आणि ईशान्य भारताचा प्रश्न निर्माण केला. हे प्रश्न तातडीने लक्ष घालून मार्गाला लावले नाहीत तर पुन्हा एक किंवा अनेक फाळण्यांचे संकट भारतावर कोसळू शकेल. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होईल ह्या काळजीपेक्षा भारताची पुन्हा फाळणी होऊ शकेल ही काळजी मोठी आहे. खोल आणि गंभीर आहे. मुंबई महाराष्ट्रापासून कधीही वेगळी होणार नाही, कारण तसे होणार नाही हे बघण्याइतका मराठी माणूस समर्थ आहे. पण भारताची पुन्हा फाळणी होणार नाही म्हणून काळजी घेण्याइतका सर्वसामान्य हिंदू राजकीयदृष्टया जागृत झालेला नाही. काँग्रेस संस्कृती देशाच्या एकात्मतेला, अखंडत्वाला, सार्वभौमत्वाला आणि स्वातंत्र्याला बाधक आहे. मोदींच्या काँग्रेसमुक्त भारताच्या घोषणेला ही पार्श्वभूमी आहे.
          
नरेंद्र मोदींना दोन गोष्टी साधावयाचा आहेत. ते हिंदू मानसिकता आत्मनिर्भर करू इच्छितात. इस्लामी आतन्कवादाचे एकंदर राष्ट्रावरील मानसिक दडपण त्यांना कायमचे नाहीसे करावयाचे आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात त्यांना पाकिस्तानला आणि इस्लामी लॉबीला एकटे पाडावयाचे आहे. भारतावर प्रत्यक्ष व छुपे हल्ले करण्याचे सामर्थ्य पाकिस्तानात शिल्लक राहू नये म्हणून ते अहोरात्र विचार करीत आहेत, योजना मार्गी लावत आहेत. त्यादृष्टीने सगळ्या देशाचा जगण्याचा उत्साह प्रतिक्षणी वर्धिष्णू होईल अशी पावले टाकीत आहेत. हिंदू बहुसंख्याकांचा कल्याणकारी, लोकशाहीवादी, समताधिष्ठित आणि तेजस्वी देश म्हणून भारताला जगाने ओळखावे हा मोदींचा संकल्प आहे आणि त्यांचा तसा विचारपूर्वक प्रयत्न राहिला आहे. म्हणून हिंदू संस्कृतीत योगासारख्या ज्या सर्व मानवजातीला उपकारक अशा गोष्टी आहेत  त्यांना वैश्विक भावविश्वात अपरिहार्य आश्वासक घटक म्हणून मान्यता मिळेल ह्यासाठी ते सुनियोजित व्यवहार करीत आहेत. मोदी भौतिक विकासाचे उद्दिष्ट ठेवतात, सबका साथ सबका विकास म्हणतात आणि हिंदुत्वाचा अभिमान बाळगतात ह्या दोन गोष्टींपासून अल्पसंख्यांकांनी योग्य तो बोध घ्यावा अशी त्यांची अपेक्षा आहे. हिंदू राज्यकर्त्यांची अगदी सुरवातीपासूनची प्राचीन परंपरा धर्मनिरपेक्षतेचीच राहिली आहे. ह्या विषयी पाश्च्यात्त तत्वज्ञान्यांचेही एकमत आहे. आपल्या तोंडचे काढून दुसऱ्याला भरविण्यात हिंदू माणसाला अननुभूत आनंद होतो. इस्रायल राष्ट्राचा १९४८ मध्ये जन्म झाला. कोणत्या प्रतिकूल परिस्थितीत हे राष्ट्र जन्माला आले हे लोकांना कळावे म्हणून ह्या राष्ट्राने त्यावेळी एक सविस्तर इतिवृत्त ग्रंथरूपाने प्रसिद्ध केले. सगळ्या जगाने ज्यू लोकांचा छळ केला पण भारताने आपल्या आश्रयास आलेल्या ज्यूंचा पोटाच्या मुलाप्रमाणे सांभाळ केला आणि त्यांना परकेपण जाणवू दिले नाही असे त्यात म्हटले आहे. जागतिक राजकारणात आणि भावविश्वात  भारताला त्याच्या परंपरेनुसार, संस्कृतीनुसार आणि वर्तमानकालीन योग्यतेनुसार जे स्थान मिळायला पाहिजे असे आपल्याला वाटते त्यापेक्षा कितीतरी मोठे स्थान मिळायला पाहिजे म्हणून मोदी गेली तीन वर्षे पंतप्रधान म्हणून एक दिवसाचीही विश्रांती न घेता दिवसाचे आठरा तास काम करीत आहेत. परंतु ह्या कामात ते यशस्वी व्हावेत अशी काँग्रेस संस्कृतीत वाढलेल्या पक्षांची इच्छा नाही. कारण काँग्रेस संस्कृती पॅरिटीचे तत्वज्ञान आपल्या विचाराचा अंगभूत भाग मानते. पॅरिटी म्हणजे मुसलमानांची आणि हिंदूंची लोकसंख्या किती आहे ह्याचा विचार न करता मुसलमानांना राजकारणात कमीतकमी पन्नास टक्के वाटा द्यायचा, मुसलमानांना जे त्यांचे अधिकार वाटतात त्याविषयी हिंदूंनी कधी शंका घ्यावयाची नाही. मुसलमानांच्या त्यांच्या कर्तव्याविषयीच्या ज्या भन्नाट भावना आहे त्याविषयी हिंदूंनी खळखळ करावयाची नाही, हे पॅरिटीचे तत्वज्ञान जिनांनी आणि मुस्लिम लीगने मांडले आणि गांधींनी त्याला मान्यता दिली. हे चित्र आमूलाग्रपणे मोदींना बदलायचे आहे. शिवसेनेने ह्या कामात मोदींना साथ द्यायला हवी. सर्वसामान्य हिंदूंवर काँग्रेस संस्कृतीकडून फाळणीसारखा जो अन्याय झाला आणि त्या भयग्रस्त वातावरणात हिंदूंना पुढेही जगायला लावण्याचा जो व्यवहार होत आहे त्यापेक्षा कोणता अधिक आणि मोठा अन्याय भाजपकडून शिवसेनेवर होत आहे? एका महापालिकेच्या निवडणुकीतील जागावाटपाचा प्रश्न हे उद्धव ठाकरे ह्यांनी काँग्रेसच्या गोटात सामील होऊन मोदींवर शस्त्र उगारावे ह्यासाठी समर्थनीय कारण आहे काय? आपल्यावर अन्याय झाल्याची नुसती भावना झाली, व्यासपीठावर मोदींच्या शेजारी बसायला मिळाले नाही की लगेच आपल्या आजोबांना आणि वडिलांना प्राणप्रिय असलेल्या हिंदुत्वावर वार करायला उद्धव पुढे सरसावत असतील तर मराठी माणसाने त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा? चांगल्यावाईटाचा सारासार विचार हा माणूस करू शकत नाही काय? 
 
खरे म्हणजे शौचालय योजनेतून मोदींनी संबंध देशाला स्वच्छतेविषयी नव्याने विचार करायला लावले, आरोग्यदायक सुधारक कृती करायला लावली. ह्या एका गोष्टीसाठी अनेक सर्वसामान्य माणसे मोदींबरोबर नेहमीसाठी राजकीय सहजीवन करायला सिद्ध आहेत. त्यांना सोडून उद्धव काँग्रेसवाल्यांबरोबर वेगळ्या रांगेत का बरे उभे आहेत?  मोदींची निर्णयशक्ती, त्यांचे वैचारिक पाठबळ आणि त्यांचा विश्वास आपल्याकडून रतिभरही कमी होणार नाही अशी काळजी प्रत्येक नागरिकाने घ्यायची आहे. ज्याला लोकांची मानसिकता बदलायची आहे, भौतिक विकासाने भारताला महासत्ता बनवायचे आहे ही ज्याची आकांक्षा आहे आणि ती फलद्रुप करण्याची ज्याची क्षमता आहे असा योग्य पंतप्रधान सत्तर वर्षाने प्रथमच आपल्याला मिळाला आहे. माननीय लक्ष्मणराव इनामदारांसारख्या अनेक मराठी संघ प्रचारकांनी मोदींच्या व्यक्तिमत्वाला आकार दिला आहे. त्यात प्राण फुंकला आहे. काही जागांसाठी त्यांच्या विरोधात जाण्याची राजकीय चूक उद्धव ह्यांनी करू नये. कारण त्याची किंमत त्यांनाच नव्हे तर सगळ्यांना मोजावी लागणार आहे.  
 
मुंबईचे मराठीपण टिकविण्याच्या शिवसेनेच्या दाव्याकडे पाहू. आज मुंबईत मराठी माणूस घराबाहेर पडला की मराठीत बोलत नाही. रिक्षावाले, भाजीवाले आणि दुकानदार ह्यांच्याशी मराठी माणूसच मराठीत बोलत नाही. तो हिंदीतून सुरवात करतो आणि समोरचा विक्रेता मराठी भाषिक आहे हे समजल्यावरही तो सवयीने हिंदीत बोलत राहतो. आपण एकेकाळी भारतावर राज्य केले आहे आणि चांगल्याप्रकारे राज्य केले आहे, अखंड भारताचे अखंड पाकिस्तान झाले नाही ह्याचे कारण मराठी तलवार आणि मुत्सद्दीपणा आहे हा आत्मविश्वास मराठी माणसामध्ये रुजविण्यास शिवसेना कमी पडली आहे. मुंबईत मराठी भाषा प्रगतीपथावर नाही उलट तिची अधोगती होत आहे ह्यात आपल्या अकर्मण्यतेचा काही वाटा नाही असे उद्धव ठाकरे ह्यांना वाटत असेल तर ते राजकारण कसले करणार आहेत? दुसरी गोष्ट खाण्यापिण्याची. मुंबई हे जगातील एकमेव असे नगर आहे कि जेथील उपाहारगृहात स्थानिक पदार्थ म्हणजे मराठी पदार्थ शिजविले जात नाहीत आणि ग्राहकांना वाढले जात नाही. मुंबईतले उपहारगृहाचे धनी बहुतेक अमराठी असले तरी त्यांचा मराठी पदार्थ शिजविण्याला विरोध नाही. मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या घरी डावीउजवी बाजू सांभाळून जे जेवण एरव्ही प्रत्येक दिवशी शिजविले जाते ते भारतातील सर्वोत्कृष्ठ नेहमीचे खाद्य आहे असा निष्कर्ष बंगलोरच्या एका सामाजिक संस्थेने एका सर्वेक्षणातून पन्नास वर्षांपूर्वी काढल्याचे मी वाचले आहे. पण आम्हाला मराठी पदार्थ पाहिजेत असा आग्रह मराठी माणूस धरत नाही आणि त्यादृष्टीने शिवसेना शक्य असूनही इच्छाशक्तीच्या अभावामुळे काही प्रयत्न करीत नाही. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून जे मुंबईत नोकरीधंद्यासाठी येतात आणि उपहारगृहात जे पुढे येते त्यावर आपला देह पोसतात त्यांना मराठी पदार्थापासून वंचित ठेवण्याचे काम शिवसेनेने "करून दाखविले "आहे.. पुन: पुन्हा करून दाखविले आहे.
 
आता माझ्या पक्षपातीपणाविषयी. मुंबई महापालिका निवडणुकीच्या संदर्भात गेल्या काही दिवसात मी तीन लेख लिहिले. त्यावरील प्रतिक्रियांचे वर्गीकरण तीन गटात करता येईल. ज्यांना मी त्यांच्या मनातलेच बोलतो आहे असे वाटले अशा लोकांनी फार म्हणजे फारच मोठ्या संख्येत प्रतिसाद दिला आहे. हे लोक महाराष्ट्राच्या सर्व भागातले, गुजरात आणि कर्नाटक राज्यातले आणि अमेरिकेतले आहेत. ज्यांना माझी शिवसेनेवरील टीका पसंत आहे अशा काही वाचकांनी मी संघ आणि भाजपावरही टीका करायला हवी असे सुचविले. काही शिवसैनिकांनी मी पक्षांध होऊन आणि भाजपकडून पैसे घेऊन लिहिले असे म्हटल्रे. जे पत्रकारितेत सध्या चालू आहे, राजकारणी आणि पत्रकार ह्यांचे संबंध जसे विकसित होत आहेत त्यावरून त्यातलाच मी एक आहे असे त्यांना वाटले असेल तर मी त्यांचा राग का करावा? घाणेरड्या आरोपांना बचावात्मक भूमिकेत जाऊन उत्तर देण्याची माझी पद्धत नाही. मी वादासाठी ते आरोप मान्य करून चर्चेला बसतो. जर भाजपकडून पैसे घेऊन मी शिवसेनेवर टीका करीत असेन तर ह्यापूर्वी मी संघावर आणि भाजपवर कडवट टीका करणारे लेख लिहिले ते शिवसेनेकडून पैसे घेऊन लिहिले हे शिवसेनेच्या पक्षपात्यांना मान्य करावे लागेल ह्या माझ्या युक्तिवादाला त्यांच्याकडे उत्तर नव्हते. मी ताकभातावर समाधान मानणारा माणूस असल्याने लिहितांना आणि लिहिल्यानंतरही पैसे मागावे असे मला आजपर्यंत कधी वाटले नाही. ह्याचे पुष्कळ किस्से आहेत. मनोहर जोशी ह्यांच्या हिंदुत्वावरील न्यायालयीन अभियोगात न्यायमूर्ती वरीअव्वा ह्यांचेसमोर माझी एकवीस तास साक्ष झाली. मी आगगाडीने पार्ल्याहून चर्चगेटला उच्च न्यायालयात जात असे आणि दुपारी जवळच्या उपहारगृहात जाऊन माझ्या पैशाने माझी पोटाची भूक भागवत असे. हिंदुत्वाचा न्यायालयीन प्रचार माझ्या हातून होत आहे ह्या आनंदात ते काम मी परिश्रमपूर्वक केले. ह्या विषयी जोशीबुवांनी एका प्रगट समारंभात माझ्याविषयी जे कृतज्ञतेचे उद्गार काढले ते सांगणे म्हणजे आत्मश्लाघा होईल म्हणून बोलत नाही. पण रामराव आदिक, रा सु गवई, मुरली देवरा, माधव गडकरी आणि शरद पवारांचे मर्यादित आर्थिक व्यवहार सांभाळणारे श्रीराम लेले आज जिवंत असते तर मला पटते तेव्हाच मी लिहितो आणि माझी किंमत करणे आजपर्यंत कोणाला जमले नाही असे त्यांनी सांगितले असते. पैसे कितीही मिळविता येतात पण हिंदुत्वावर आघात होत असतांना गप्प बसणार असू तर त्या पैशांना काय चाटायचे आहे? उद्धव आज हिंदुत्वावर आघात करत आहेत ही माझी खंत आहे. असो. 
 
लेखक: अरविंद विठ्ठल कुळकर्णी 
मोबाईल: 9619436244
ईमेल: [email protected]
https://arvindvkulkarni.wordpress.com/