शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 जानेवारी 2017 (17:01 IST)

ग्राहकांनाही मिळणार 'नवप्रकाश' योजनेचा लाभ

थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडित झालेल्या शेतकऱ्यांनाही आता महावितरणने सुरु केलेल्या 'नवप्रकाश योजने'त लाभ मिळणार आहे. तर न्यायप्रविष्ट प्रकरणात हुकूमनामा (डिक्री) मंजूर झालेल्या विशिष्ट प्रकरणांचाही या योजनेत नव्याने समावेशही करण्यात आला आहे. थकीत देयकांमुळे कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित झालेल्या उच्च व लघुदाब वीज ग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी महावितरणने १ नोव्हेंबर २०१६ पासून 'नवप्रकाश योजना' सुरु केली असून या योजनेचा आता थकबाकीदार शेतकरीही फायदा घेऊ शकणार आहेत.
 
'नवप्रकाश' योजनेच्या सुरुवातीला सार्वजनिक नळपाणी पुरवठा व शेतीपंप वगळण्यात आले होते. मात्र आता थकीत देयकापोटी ३० मार्च २०१६ पूर्वी कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेल्या शेतकऱ्यांनाही 'नवप्रकाश' योजनेचा लाभ गेट येणार आहे. ३० मार्च २०१६ पूर्वी वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आलेल्या उच्च व लघुदाब ग्राहकांसह संबंधित कृषिपंप ग्राहकांनी जानेवारी अखेरपर्यंत त्यांच्या मूळ थकबाकीचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकाराची रक्कम माफ करण्यात येणार आहे. ही योजना एप्रिल अखेरपर्यंत सुरु राहणार असून फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान थकबाकीदारांना मूळ थकबाकी तसेच व्याज व विलंब आकाराची २५ टक्के रक्कम भरावी लागेल. या ग्राहकांना थकबाकीवरील व्याज व विलंब शुल्कात ७५ टक्के सूट मिळेल.
लोक अदालत किंवा न्यायप्रविष्ट प्रकरणातील थकबाकीदारांनाही या योजनेत सहभागी होता येईल. याशिवाय न्यायप्रविष्ट प्रकरणात हुकूमनामा (डिक्री) मंजूर होऊन १२ वर्षे पूर्ण झालेल्या थकबाकीदारांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या थकबाकीचा तपशील www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे. इंटरनेटची सुविधा नसलेल्या ग्राहकांना त्याच्या थकबाकीचा तपशील महावितरणच्या शाखा कार्यालयापासून मंडल कार्यालयापर्यंत तातडीने उपलब्ध करून देण्यात येत आहे. कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.