बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

वन नाईट स्टॅड म्हणजे लग्न नव्हे!

वन नाईट स्टँड किंवा स्त्री-पुरुषामधील शरीरसंबंध म्हणजे हिंदू कायद्यानुसार लग्न ठरत नाही असे मत मुंबई हायकोर्टाने मांडले आहे. अशा संबंधांमधून जन्माला येणाऱ्या मुलांना त्यांच्या पित्याच्या संपत्तीमध्ये हक्क मिळू शकत नाही असेही हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.
 
मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीश मृदुला भाटकर यांनी एका प्रकरणाच्या सुनावणीत हिंदू कायदा आणि वन नाईट स्टँडविषयी मत मांडले. ‘धार्मिक विधी किंवा कायदेशीर पूर्तता केल्यानंतर एखाद्या नात्यावर लग्नाचा शिक्का मारता येईल. पण फक्त स्वेच्छेने किंवा अनावधानाने ठेवलेले शरीरसंबंध म्हणजे लग्न ठरत नाही’ असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले.
 
काही देशांमध्ये समलिंगी जोडप्यांना लग्नाची परवानगी आहे, तर काही ठिकाणी लिव्ह इन रिलेशनशिपमधून जन्माला येणारे बाळ हा गंभीर विषय मानला जातो. त्यामुळे कायदेतज्ज्ञांनाही लग्नाची व्याख्या सांगणे कठीणच असते असे न्यायाधीशांनी म्हटले आहे. न्यायाधीशांनी हिंदू मॅरेज अॅक्टमधील १६ व्या कलमाकडेही लक्ष वेधले. हिंदू विवाह कायद्यानुसार मुलांच्या अधिकारासंदर्भात निर्णय घेण्यासाठी लग्न झाल्याचे सिद्ध करावे लागते. मग त्या लग्नाला बेकायदेशीर ठरवण्यात आले असले तरी मुलांना अधिकार मिळू शकतो. 
 
मुंबई हायकोर्टासमोर आलेल्या प्रकरणात एका पुरुषाने दोन लग्न केले होते. त्याने दुसरे लग्न केल्याचा पुरावाही होता. तरीदेखील कोर्टाने त्याचे दुसरे लग्न अवैध ठरवले. पण दुसऱ्या लग्नातून जन्माला आलेल्या मुलीचा पित्याच्या संपत्तीमध्ये हक्क कायम असल्याचे हायकोर्टाने स्पष्ट केले.