शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 मार्च 2021 (07:49 IST)

आरटीई प्रवेश प्रक्रियेला ऑनलाईन सुरुवात

आरटीई प्रवेश प्रक्रियेला ऑनलाईन सुरुवात झाली. प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षेत असलेल्या पालकांनी संकेतस्थळ सुरू होताच त्यावर अर्ज भरण्यासाठी प्रचंड गर्दी केली. त्यामुळे सुरुवातील संकेतस्थळ धीम्या गतीने सुरू राहिल्याने पालकांना अर्ज भरण्यात अडचणी येत होत्या. मात्र, थोड्याच वेळात संकेतस्थळ सुरळीत सुरू झाल्याने पालकांनी मोठ्या प्रमाणात अर्ज भरले. पहिल्या दिवशी संपूर्ण राज्यातून तब्बल १० हजार ५६३ विद्यार्थ्यांचे अर्ज भरले. २०२१-२०२२ या वर्षाकरिता आरटीई अंतर्गत २५ टक्के ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी ३ मार्चला दुपारी ३ वाजता सुरुवात झाली. खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये आरटीईअंतर्गत प्रवेश मिळत असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील पालकांचे लक्ष आरटीई प्रवेश प्रक्रियेकडे लागलेले असते.
 
पहिल्याच दिवशी संपूर्ण राज्यातून तब्बल १० हजार ५६३ पालकांनी अर्ज केले. यामध्ये पुण्यामध्ये सर्वाधिक २९७० पालकांनी अर्ज केले. त्याखालोखाल नागपूर ११५२, नाशिक ११४२, ठाणे ८४९, मुंबई ५९३, रायगड ५४९, औरंगाबादमध्ये ४९१ पालकांनी ऑनलाईन अर्ज केले. आरटीई प्रवेशासाठी राज्यभरामध्ये ९४३१ शाळांमध्ये ९६ हजार ६२९ जागा आहेत. आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी २१ मार्च पर्यंत https://rte25admission.maharashtra.gov.in आणि https://student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. आरटीईअंतर्गत आपल्या पाल्याला प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या पालकांनी प्रवेशाकरिता आवश्यक कागद पत्रे तयार ठेवावीत, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.